इडली
- Ketaki
- Jul 2, 2018
- 1 min read
तिच्याबरोबर ओळख होऊन 30-35 वर्ष झाली असावीत. पुण्याला व्याडेश्वर मधून बाबांनी आणलेलं पार्सल पुसटसं आठवतं. ती लहान फुलक्याच्या आकाराची असायची, द्रोणामधे पॅक करून दिलेली. बरोबर खोबऱ्याची चटणी. मग केव्हातरी आई घरीच करायला लागली. तिला हलकी फुलकी कशी बनवावी ह्याची काकूबरोबर केलेली चर्चा ऐकू यायला लागली. फार क्वचित पासून पंधरा दिवसातून एकदा तरी अशी ती घरी अवतरायला लागली. हॉटेल मध्ये कधीतरी गेलो की तिचाच सख्खा भाऊ आवडायला लागला. घरी मात्र करताना तो असा चिकटून बसायचा की त्याला उतरवताना घाम फुटायचा. हळू हळू निर्लेपने आणि अनुभवाने तो प्रश्न छान सोडवला.
हातात स्वयंपाकघर आणि डोक्यावर जवाबदारी आल्यावर हिचाशिवाय घर कधी चालेनासं झालं कळलंच नाही. दिवसाआड घरात सकाळी तो खमंग आंबट सुगंध दरवळायला लागला. कधीही भूक लागली तर तिचा भाऊ आनंदाने तव्यावरून उतरायला लागला. मग भाज्या घालून केलेले खमंग आप्पे, कधीतरी आकार बदलून आणि मिरपूड घालून केलेला ढोकळा असे तिचे आते/मामे/चुलत भाऊ दिसू लागले. मग एक त्रिकोणी साचा मिळाला आणि तिचं रूप खूपच विलोभनीय झालं. हॉटेलमध्ये खाल्लेले वेगवेगळे प्रकार त्यांच्या दाक्षिणात्य नावांसकट पण मराठी फोडणी देऊन घरात बनू लागले.
आज घर हिचावाचून चालत नाही. प्रवासात ही असतेच बरोबर. कोथिंबीर, पुदिना चटणी, चविकरता एखादा काजू किंवा चविष्ट फोडणी आपल्या पोटात अगदी सहज सामावून घेते ही. घरी पाहुणे आले तर हीच कुठल्या न कुठल्या रूपात माझं काम सोपं करते. आणि सहसा कुणाला न आवडण्याचा प्रश्न येतंच नाही. सांबार, तीळकुट, नारळाची चटणी, काही नाही तर मेतकूट किंवा तूप असले तरी हिचं सगळ्यांबरोबर आणि सगळ्या वयोगटांबरोबर जमतच.
सोय, चव, सहज उपलब्धता, इतकंच काय तर अन्नघटकांच्या स्पर्धेतही हिचा अव्वल नंबर लागतो. पण मला सगळ्यात जास्त कौतुक ह्या गोष्टीचं वाटतं की भारतभर चवीने केली आणि खाल्ली जाणारी ही इडली आपली दाक्षिणात्य ओळख कधीच सोडत नाही.
Comments