लॉकडाउन
१० मे २०२०
"लॉकडाउन" या नाविन्यपूर्ण संकल्पनेने लोकांना जितकं पेचात टाकलं तितकाच त्यांच्या सर्जनशीलतेला ऊत आणला. Facebook आणि WhatsApp या हक्काच्या माध्यमांचा उपयोग करून बऱ्याच जणांनी स्टार स्टेटस मिळवलं. प्रत्येकाच्या आत दडलेले, लपलेले, बाहेर यायला टपलेले कलागुण बाहेर येऊ लागले. चित्रकला, संगीत, नृत्य, लेखन, वक्तृत्व - ज्या कला केवळ उपजीविकेचं साधन नाहीत म्हणून बाजूला सारल्या गेल्या आहेत - त्यांना या लॉक डाउन मुळे मोकळं मैदान मिळालं. यात मला सर्वात जास्त आवडले ते WhatsApp वर काही अत्यंत उद्योगशील माणसांनी चालवलेले उपक्रम - मेडिटेशन ग्रुप्स, quizzes, workout challenges, poetry chains, accountability ग्रुप्स - असे विधायक उपक्रम जे स्वतःबरोबर इतरांनाही प्रेरणादायी ठरले. आम्ही राहतो तिथे लॉक डाउन नाही. परंतु सोशल डिस्टंसिन्ग, घरून काम करणे यातून आलेला संथपणा निश्चित आहे. वर लिहिलेल्या काही उपक्रमांमध्ये मी सहभागी झाले आणि खूप चांगला अनुभव आला. मग स्वतःसाठी काही उपक्रम सुरु करावा असं मनात आलं. १. येईल तसं रोज एखादं चित्र, पेन्टींग, विणकाम, भरतकाम किंवा तत्सम करणे - मुळात हे कलागुण अंगात तितकेसे नसल्याने उत्तमच व्हावं असा अट्टाहास न ठेवता २. फेसबुक हे माध्यम distraction या तत्त्वावरंच चालतं असा माझा अनुभव आहे तरीही फेसबुक वरील एखाद्याचं ओरिजिनल लेखन, संगीत, भाषण, distract न होता मनापासून वाचून/ऐकून त्यावर योग्य ती दाद देणे ३. रोज एक नवा पदार्थ करणे - सामान्यपणे कुठल्याही भारतीय घरात असलेल्याच वस्तू घेऊन पारंपरिक किंवा पारंपरिक पदार्थांवर आधारित न्याहारीचा पदार्थ बनवणे पहिल्या दोन गोष्टी वैयक्तिक पातळीवर छान चालू आहेत आणि खूप आनंद देत आहेत. जमेल तितके दिवस त्या चालू ठेवाव्या असं वाटतंय. तिसरी गोष्ट करणे मात्र माझ्यासाठी एक आव्हान होते. एक तर रोज नवीन पदार्थ सुचणे, त्याचे नियोजन करणे, आणि ते खाण्याच्या योग्यतेचे होतीलच याची खात्री असणे - सगळंच कठीण! करून बघितल्याशिवाय जमतंय का नाही हे कसं कळणार असं म्हणून सुरुवात केली. घरातल्यांनी कौतुकाने फोटो काढले (आणि खाल्लं ही!). मग त्याची पद्धतशीर नोंद सुरु केली आणि मग पदार्थांबद्दल लिखाण ही सुरु झालं. स्वयंपाक हा विषय इतर सगळ्यांप्रमाणेच मीही आई आणि सासूबाई यांच्याकडेच शिकले आणि शिकत आहे. आईकडून "पाकशास्त्र" आणि सासूबाईंकडून "पाककला" अशा दोन वेगळ्या दृष्टिकोनातून स्वयंपाक शिकायला मिळाला. स्वयंपाक या विषयाची मला आवड नाही. प्रेमाने वेळोवेळी मला "स्वयंपाकात अडकू नकोस, जा दुसरं काहीतरी कर, मी हे बघून घेते" असं सांगून मोकळं करणाऱ्या या दोघींनीच तितक्याच प्रेमाने कर्तव्य म्हणून स्वयंपाक केलाच पाहिजे हेही शिकवलं. Temperature-Pressure relationship, effect of solute on boiling point हे विषय स्वयंपाकघरात आणि डाईनिंग टेबल वर शिकवणारे आई-बाबा, आणि स्वयंपाक आणि खाद्यसंस्कृतीतून मिळणारा आनंद आणि समाधान असे फार वेगळ्या पातळीवरचे विषय ज्यांच्या संस्कारांतून शिकले ते सासू-सासरे यांच्यामुळेच आज माझं स्वयंपाकघर चालू आहे. आज Mother's Day निमित्त माझ्या दोन Mothers ना माझं लिखाण मी ब्लॉग स्वरूपात समर्पित करत आहे. हे लिखाण पाककृती स्वरूपाचे नाहीच - कारण नवीन असं मी काही केलंच नाही. परंतु खाद्यपदार्थ म्हणजे संस्कृती. आणि संस्कृती म्हणजे व्यक्ती आणि आठवणी. आणि आपल्यासारख्या विकसित संस्कृतीत विज्ञान हे आलंच! माझे प्रयत्न, अनुभव, यश, अपयश इथून पुढे काही दिवस इथे नोंदवेन. आवडल्यास like करा, share करा आणि आपले अभिप्राय कळवा.