उपमा
- Ketaki
- Jul 1, 2020
- 2 min read
Updated: Oct 8, 2022
पॉरिज - एखाद्या धान्याची किंवा पिष्टमय भाजी/कंदाची पाण्यात किंवा दुधात केलेली खीर, प्रसंगी गोड नसलेलीही

लहानपणी हे बडबडगीत शिकलेलं आठवतं:
Pease porridge hot, pease porridge cold, Pease porridge in the pot, nine days old; Some like it hot, some like it cold, Some like it in the pot, nine days old.
पॉरिज म्हणजे नेमकं काय हे तेव्हा माहिती नसायचं. फक्त गोल्डीलॉक्सच्या गोष्टीतल्या पॉरिजबद्दल वाचलं की पॉरिज बद्दल खूप कुतूहल वाटायचं आणि ते खायची खूप इच्छा व्हायची. थोडं मोठं झाल्यावर कळलं कि पॉरिज म्हणजे काही फारच शानदार आणि एक्झॉटिक प्रकार नसून आपल्या घरी आठवड्यातून किमान २/३ वेळा होतोच!
पॉरिज - एखाद्या धान्याची किंवा पिष्टमय भाजी/कंदाची पाण्यात किंवा दुधात केलेली खीर, प्रसंगी गोड नसलेलीही. जगभरच्या खाद्यसंस्कृतींमध्ये या न त्या प्रकारे न्याहारीला पॉरिज असतेच. दिवसभर कष्ट करण्याआधी न्याहारीला भरपूर एनर्जी देणारे पदार्थ खाण्याची प्रथा पडली असावी असं मला वाटतं. आपल्याकडे गहू, तांदूळ, नाचणी या धान्यांचे पॉरिज प्रचलित आहे - कधी शिरा, कधी खीर/लापशी, कधी आंबील, कधी मऊभात आणि कधी उपमा या स्वरूपात. इतर संस्कृतींमध्ये ओट्स, बार्ली, ज्वारी, मका ही आणि इतर धान्य वापरलेली दिसतात. भाज्यांमध्ये वाटाणा, बटाटा, रताळं, टॅपिओका/कसावा (cassava) यांची पोरीज प्रचलित आहेत.
तर आज आमच्याकडे उपमा नावाचं पॉरिज केलं. मी स्वतः स्वयंपाक करायला लागले त्यानंतर बरीच वर्ष उपमा करत नव्हते. कारण मला उपमा करायची भीती वाटायची. काही ठिकाणी मी नवशिक्यांच्या हातचे किंवा लग्नसमारंभात किंवा हॉटेल मध्ये फार गमतीशीर उपमे खाल्ले होते - कधी रवा न भाजताच केलेला उपमा, कधी टोमॅटोच्या रसात न्हाऊन निघालेला उपमा, कधी पांढऱ्या रव्यापासून केला असा विश्वास बसू नये अशा तपकिरी रंगाचा उपमा, कधी तोंडात घातला कि तोंडच चिकटून बसेल असा उपमा, कधी पाणी पिऊन ढकलल्याशिवाय घशाखाली उतरणार नाही असा उपमा! आणि एकदा तर इतका आंबट की तो ताकात मुरवून आंबवलाय कि काय अशी शंका यावी - तेव्हा "some like it in the pot, nine days old" याची अनुभूती आली होती! आपण उपमा केला तर नक्की काय घडेल अशी भीती वाटायची!
मग शेवटी एक दोनदा प्रयत्न केला आणि जमलं की हो! मला आवडतो तसा उपमा मला करायला जमला आणि घरातले ही काही ना बोलता आनंदाने खाऊ लागले!
माझ्या उपक्रमाला पूर्ण दोन आठवडे झाले! १४ दिवस न्याहारीला रोज वेगळा पदार्थ केला. अजून किती दिवस जमेल अशी शंका यायला लागली. पण यादीत काही पदार्थ अजून शिल्लक होते म्हणून काम चालु राहिलं. उद्या सकाळी काय करावं हा प्रश्न आधी त्रास द्यायचा पण आता तो हुरूप द्यायला लागला!
Comentários