शेवई उपमा
- Ketaki
- Aug 9, 2020
- 1 min read
Updated: Oct 8, 2022
आपण मूळ उष्ण प्रदेशातील माणसं असल्याने आपलं सर्व पाकशास्त्र हे आपल्या हवामानासाठी निर्माण झालेलं आहे. गरम वाफाळलेला पदार्थ हा जंतुविरहित असतो, सुरक्षित असतो...

आपल्याला सर्वांनाच आपल्या संस्कृतीतले बरेचसे पदार्थ हे गरम खायला आवडतात. आपल्या पदार्थांमध्ये मुबलक प्रमाणात मसाले आणि कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर यासारखे सुगंधी घटक असतात. बऱ्याच वेळा या घटकांचा सुगंध दरवळणं हे पदार्थात असलेल्या स्निग्धांच्या तापमानावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ कढीलिंब गरम तेलात पडल्यावर जितका सुगंध येतो तितका गार तेलात पडल्यावर नक्कीच येत नाही.
यात आपल्या भौगोलिक वातावरणाचाही भाग असावा. आपण मूळ उष्ण प्रदेशातील माणसं असल्याने आपलं सर्व पाकशास्त्र हे आपल्या हवामानासाठी निर्माण झालेलं आहे. उष्ण आणि दमट हवामानात शिजवलेलं अन्न लवकर खराब होऊ शकतं आणि अपायकारक ठरू शकतं. गरम वाफाळलेला पदार्थ हा जंतुविरहित असतो, सुरक्षित असतो आणि त्या अनुभवातून आपल्या मेंदूमध्ये गरम पदार्थांची जास्त आवड निर्माण झाली असेल अशी शक्यता आहे. गरम आणि गार अन्नाच्या texture मध्येही चांगलाच फरक पडतो आणि त्यामुळेही आवडीमध्ये फरक पडत असावा.
मला एकदा केलेला पदार्थ परत गरम करायला खूप कंटाळा येतो. तसं केल्याने एकदाच ताजं करून लगेच खाल्ल्याचं/खायला घातल्याचं इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन निघून जातं. न्याहारी साठी म्हणून केले जाणारे आपले बरेच पदार्थ, उदाहरणार्थ पोहे, उपमा, घावन, आपल्याला साधारणपणे गरमच आवडतात. याला एकच गमतीशीर अपवाद - शेवयांचा उपमा. करायला सोपा, घरात चार भाज्या असल्या की झालं. तो ही गरम असला तर अधिक चांगला लागतोच, पण एकदा सकाळी केला की पुढच्या २-३ तासात गरम न करता खाल्ला तरी आवडतो.
रविवारच्या विस्कळीत दिनचर्येत शेवई उपमा फिट्ट बसतो!
Comments