उकडलेली कडधान्य
- Ketaki
- Aug 16, 2020
- 2 min read
Updated: Nov 30, 2022
जगात, आजूबाजूला निराशाजनक वातावरण असलं तर आजचा दिवस हा काहीतरी लहानसे ध्येय समोर ठेवून प्रसन्न करता येतो

आज एक खूपच चविष्ट, पौष्टिक आणि करायला अतिशय सोपा पदार्थ केला - उकडलेली कडधान्य. रात्री हिरवे मूग, मटकी, चणे, आणि वाटाणे एकत्र भिजत घातले, त्याबरोबर थोडी चण्याची डाळ आणि शेंगदाणे ही भिजवले आणि सकाळी प्रेशर कुकर मध्ये दाणा अखंड राहील असे शिजवले. वरून थोडं मीठ, मिरपूड, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून गरम वाढले.
एखादा परिपूर्ण आणि चविष्ट पदार्थ जेव्हा करायला खूप सोपा असतो तेव्हा त्याला पुरेसे ग्लॅमर मिळत नाही. टीव्ही वरचे कुकरी शो असोत किंवा पाकक्रियांची भरमसाठ पुस्तकं असोत, या माध्यमांमुळे करायला अवघड, नाविन्यपूर्ण सामग्री असणारे आणि मोहक दिसणारे पदार्थ करता येणे म्हणजे पाककला असा (गैर)समज होऊ शकतो. रेसिपीस आणि cookbooks च्या भडिमारात हाताशी जे आहे त्यातून चांगलं सुग्रास आणि पोषक अन्न शिजवता येणं ही पण कलाच हे आपण विसरतो की काय?
बेकिंग सारख्या पाश्चात्य पाकशास्त्रात मापाला अनन्यसाधारण महत्व असतं. काही ग्रामच्या फरकाने पदार्थ चुकू शकतात. आपले काही अपवादात्मक पदार्थ सोडले तर कुठल्याच पदार्थांच्या कृती इतक्या rigid नसतात. नजरेच्या अंदाजाने आपण सगळेच उत्तम स्वयंपाक करु शकतो. ही खूप मोलाची कला नाही का?
न्याहारीच्या या उपक्रमाने आता २५ दिवस पूर्ण केले. रोज काय करावं हा विचार, त्याचे नियोजन आणि पदार्थ करणे यातून एक समाधान मिळाले. लेख लिहिण्यात अजून काही दिवस छान गेले. यातून रोजच्या कंटाळवाण्या झालेल्या न्याहारी नावाच्या विषयाला चैतन्य आले. न्याहारी करायचीच आहे तर उत्साहाने करून त्यातून काही नवीन अनुभव घ्यावेत, नवीन काही शिकावे असा विचार सार्थकी लागला.
जगात, आजूबाजूला निराशाजनक वातावरण असलं तर आजचा दिवस हा काहीतरी लहानसे ध्येय समोर ठेवून प्रसन्न करता येतो याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला. पदार्थांच्या निमित्ताने आठवलेले प्रसंग, माणसं यातून आपण आज जे असतो ते किती वेगवेगळ्या संस्कारातून घडलेले असतो याची जाणीव झाली.
अजूनही बरेच पदार्थ यादीत आहेत. तिखट मिठाच्या पुऱ्या, गोड खांडवी, उकडपेंडी, डोसा, उत्तपा, तांदळाचे दुधातले घावन,...
जे पदार्थ करून झाले त्यात थोडासाच फेरबदल करूनही मोठी यादी होईल. ढोकळ्याचे प्रकार, वेगवेगळ्या पिठाची धिरडी, वेगवेगळे थेपले आणि पराठे, इडली चे प्रकार, पोह्यांचे प्रकार... अजून १५ पदार्थ आरामात होतील. पण आता घरच्यांकडून गेल्या २५ दिवसांत केलेल्या पदार्थांची "वन्स मोर" अशी फर्माईश येऊ लागली आहे. इतके दिवस रोज आपल्याला फार कष्टांशिवाय वेगळा पदार्थ करता येतो हा आनंद माझ्यासारख्या स्वयंपाकाची फार आवड नसणारीसाठी मोलाचा आहे.
लेखांच्या निमित्ताने बरंच वाचन झालं. आणि फेसबुकच्या माध्यमातून बऱ्याच मित्र-मैत्रिणींशी संवाद साधता आला. काहींनी काही पदार्थ सुचवले, काहींनी "तुझा लेख वाचून आम्हीही हा विस्मृतीत गेलेला पदार्थ आवर्जून पुन्हा करून बघितला" हे कळवलं. मी फेसबुक वर पोस्ट करण्याआधी काही जवळच्या मंडळींनी माझे लेख वाचून मला काही मोलाच्या सूचना केल्या.
या उपक्रमात माझ्याबरोबर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी झालेल्या माझ्या घरच्यांचे, मित्र-मैत्रिणींचे आणि फेसबुककरांचे मनापासून आभार मानून मी आता निरोप घेते. न्यारी-न्याहारी हे पेज जणू माझी या काळातली रोजनिशी आहे. आपल्या प्रतिक्रिया इथे आणि मेसेज करून जरूर कळवत रहा!
Comments