मुठिया
- Ketaki
- Jul 19, 2020
- 2 min read
Updated: Oct 8, 2022
आपण भारतीय नेहमी स्वयंपाक थोडा जास्तच, सढळ हाताने करतो आणि उरलेलं अन्न refurbish करण्यात आपल्याशी स्पर्धा कोणी करू शकत नाही

हल्ली पार्टी/समारंभ असला की हमखास "फिंगर फूड" करतात - उदाहरणार्थ लहान सँडविच, लहान सामोसे, भजी/वडे या वर्गातले पण इंग्लिश नाव असलेले पदार्थ, स्प्रिंग रोल इत्यादी. हाताने खाता येतील असा अर्थ नावातच असलेले हे पदार्थ खातात मात्र टूथपिक टोचून टिशू पेपरवर घेऊन. ती टूथपिक त्या पदार्थात टोचून तोंडाच्या आत जाईपर्यंत कधीकधी फारच गमतीशीर गोष्टी घडतात. पदार्थ कधी खूप कडक असल्याने त्यात टूथपिक जातच नाही. कधी तो पदार्थ खूप ठिसूळ किंवा मऊ असल्याने टूथपिक त्यात टोचताच तो मोडून पडतो. कधीकधी टूथपिक मुळे पदार्थ अती गरम असलेला कळत नाही आणि पार्टी मधल्या गर्दीत तो ज्वालामुखी तोंडात ठेवून हसतमुखाने उभं राहावं लागतं. हे सगळं घडल्यावर या फिंगर फुडांना दुसऱ्या फेरीत फिंगरनेच खायची सुबुद्धी आपली आपण होते. काही पद्धती उगीचच पडतात. आणि त्यांची फॅशन निघून जाईपर्यंत त्या पद्धती मनसोक्त जगून घेतात.
आज आम्ही केलं एक स्वाभिमानी फिंगर फूड! हाताच्या मुठीत आकारलेले आणि हातानेच खायचे, नावातच हात असलेले मुठिया! गाजर किसून त्यात मीठ, लाल तिखट, हिंग आणि हळद घालून त्याला पाणी सुटू दिलं. त्यात बेसन कालवून लंबगोल आकार देऊन वाफवलं. थंड झाल्यावर त्याचे तुकडे कापून मोहरी, हिंग, तीळ आणि कढीलिंब घालून फोडणीत परतलं. काही घरी फोडणी न करता ते मुठिया तेलात तळतात. आपल्या वैयक्तिक आवडीनुसार मऊपणाकरता सोडा, आंबटपणाकरता लिंबूरस किंवा सायट्रिक ऍसिड क्रिस्टल असे बदल ही असतात. गाजराऐवजी कोबी, दुधी, मेथी अशी भाजी ही वापरतात. मला आपल्या कोथिंबीरीच्या वड्या म्हणजे कोथिंबीरीचे मुठीयाच वाटतात.
मुठीयांचं दुसरं प्रसिद्ध रूप म्हणजे उरलेल्या भाताचे मुठिया. भातात बेसन आणि मीठ कालवून, वाफवून मग तेलाच्या फोडणी वर परततात. आपण भारतीय नेहमी स्वयंपाक थोडा जास्तच, सढळ हाताने करतो आणि उरलेलं अन्न refurbish करण्यात आपल्याशी स्पर्धा कोणी करू शकत नाही. झीरो वेस्ट, "रिड्यूस - रियुज - रिसायकल" असे शब्द न वापरता आपल्या खाद्य परंपरेतून हे सगळं शिकलेली आपण माणसं टूथपिक आणि टिशू पेपर वापरत सस्टेनेबिलिटीच्या गप्पा मारतो तेव्हा "कालाय तस्मै नमः" म्हणण्याशिवाय काहीही पर्याय उरत नाही!




Comments