रताळ्याचा कीस
- Ketaki
- Jun 15, 2020
- 2 min read
Updated: Oct 8, 2022
रताळ्याला पाण्यात ठेवून आलेली रोपटी सुंदर दिसतात. एका रताळ्याच्या तुकड्यातुन २०-२५ रोपटी उगवतात

उपवासाच्या दिवशी माहेरी घरात निश्चित केला जातो तो पदार्थ म्हणजे रताळ्याचा कीस. बाबांना आवडतो म्हणून आई नक्की करते. जिरं-मिरचीची तुपातली फोडणी करून, त्यावर किसलेलं रताळं आणि शेंगदाण्याचं कूट घालून, झाकून वाफ दिली की अगदी पटकन हा कीस होतो.
रताळ्याच्या अनेक जाती आहेत असं वाचलेलं आहे. मुंबईत असताना आतून पांढरी असलेली रताळी परिचित होती. हाँगकाँगला आल्यावर रताळ्याचे अजून दोन रंग बघितले - पिवळा/केशरी आणि जांभळा. जांभळ्या रताळ्याच्या आत खूप शिरा असतात तशा केशरी रताळ्यात नाही निघत. केशरी आणि जांभळी रताळी गोड आणि चविष्ट लागतात. रताळ्याची पानंही इथे भाजी म्हणून खातात आणि ती अतिशय छान लागतात. मुंबईत रताळी फक्त उपवासाकरता खाल्ली जायची. इथे मात्र ती वाफवून किंवा ओव्हन मध्ये भाजलेल्या चिप्सच्या रूपात नियमितपणे खाल्ली जातात.

लहानपणी आमच्या घरी आणि दोन्हीकडच्या आजी-आजोबांच्या घरीही कायम आजूबाजूला झाडं असायची आणि त्याबद्दल सर्वांनाच कुतूहल असायचं. सततच मातीत काहीतरी लावून बघणे, त्याचा अभ्यास आणि नोंद करणे असे प्रकार चालू असायचे आणि त्याला प्रोत्साहन दिलं जायचं. इथे एक-दोनदा रताळ्याला मोड आलेले दिसले. तिथे असताना रताळी कधी लावली नव्हती. इथे ते करून बघितलं आणि खूप मजा आली. रताळ्याला पाण्यात ठेवून आलेली रोपटी सुंदर दिसतात. एका रताळ्याच्या तुकड्यातुन २०-२५ रोपटी उगवतात. ती अलगद काढून मातीत लावली की सहज रुजतात, वाढतात आणि वाळून जातात. जेव्हा ती वाळतात तेव्हा मातीखाली नवीन रताळी तयार झालेली असतात.


आमच्याकडेही लहानशा कुंडीत रताळी आली होती. पण मला हे माहितीच नव्हतं. रोपटं वाळून गेलं तेव्हा मी कुंडी तशीच पाणी न घालता ठेवून दिली. बऱ्याच दिवसांनी दुसरं झाड लावायला त्या कुंडीतली माती काढली तेव्हा त्यातून गमतीशीर लहान लहान रताळी बाहेर आली. मात्र ती पूर्ण सुकून गेली होती त्यामुळे वापरता आली नाहीत. आता माहिती आहे, त्यामुळे आता आमच्या ६ इंची लहान कुंडीत लवकरच मी रताळ्याची शेती करण्याच्या विचारात आहे!
Comments