तांदळाची उकड
- Ketaki
- Jun 24, 2020
- 2 min read
Updated: Oct 8, 2022
पाश्चात्य जगात आज ग्लूटेन फ्री च्या भानगडीत तांदळाच्या पिठाला महत्व प्राप्त झालं आहे. पूर्वेकडे मात्र गव्हाच्या पिठाइतकंच महत्व तांदळाच्या पिठाला कायम होतं

आशिया खंडातले सर्व देश तांदूळ मोठ्या प्रमाणात वापरतात आणि तांदुळ वापरून केलेले अनेक वेगवेगळे पदार्थ इथल्या सर्व संस्कृतींमध्ये आहेत. आपल्याकडे कुठल्या पदार्थासाठी कुठल्या जातीचा तांदूळ वापरावा हे साधारण ठरलेलं असतं तसंच इथे ही आहे. तांदळाचे इथे ढोबळ दोन प्रकार मिळतात - साधा तांदूळ आणि चिकट तांदूळ (sticky/glutinous rice). दोन्ही प्रकारच्या तांदळाचं पीठही अगदी सहज मिळतं. पाश्चात्य जगात आज ग्लूटेन फ्री च्या भानगडीत तांदळाच्या पिठाला महत्व प्राप्त झालं आहे. पूर्वेकडे मात्र गव्हाच्या पिठाइतकंच महत्व तांदळाच्या पिठाला कायम होतं. इथे तांदळाच्या पिठाचे वाफवलेले केक, पातोळीसारखे, मोदकासारखे पदार्थ खूप बघायला मिळतात. तांदळाचं पीठ वापरून नूडल्स ही बनतात. पीठ करायचे तीन प्रकार प्रचलित आहेत - तांदूळ भिजवून आधी वाळवून मग दळणे, तांदूळ भिजवून आधी दळून मग वाळवणे, आणि तांदूळ न भिजवता दळणे. प्रत्येक प्रकारचं पीठ हे विशिष्ट पदार्थांसाठी वापरलं जातं. सर्व पद्धतींमध्ये तांदळाच्या पीठाचे रासायनिक रूप किंचित वेगळे असते आणि त्या बदलांचा परिणाम समजून आपल्या किंवा इथल्या देशांच्या पारंपरिक स्वयंपाकात त्याचा वापर केलेला दिसतो.
तांदळाची ताकातली उकड हा आपल्याकडील एक छान पदार्थ. हा पदार्थ मी लहान असताना आई करायची. मग केव्हातरी तो उगीचंच हरवला आणि या उपक्रमानिमित्त परत एकदा बाहेर आला.
मोहरी, जिरं, हिंग, हळद, कढीलिंब, मिरची आणि आलं घालून तेलाची फोडणी केली. त्यात ताक आणि पाण्याचं मिश्रण, आणि त्यात मीठ असं घालून उकळलं. एकीकडे ताक आणि पाण्याच्या अर्ध्या प्रमाणात तांदळाचं पीठ गुठळ्या न ठेवता थोड्या पाण्यात कालवलं, आणि उकळत्या मिश्रणात घालून, झाकण ठेवून शिजवलं. शिजल्यावर कोथिंबीर आणि वरुन तूप घालून गरम वाढलं!
करायला अत्यंत सोपा, सकाळच्या घाईत १० मिनिटांत अगदी सहज होणारा, जीभ आणि पोटाबरोबर मनालाही समाधान देणारा हा पदार्थ इतकी वर्ष आठवणीतून कसा काय हरवला होता माहिती नाही. परंतु या उपक्रमामुळे आता त्याने आमच्या घरी नक्कीच जोरदार "कम बॅक" केलेला आहे!




Comments