नियमावली
- Jun 8, 2020
- 2 min read
Updated: Oct 8, 2022
उपक्रमाच्या स्वैर रूपाला काहीतरी नियम घालून घ्यावेसे वाटले आणि कागद पेन्सिल घेऊन उपक्रमाची नियमावली लिहिली.

माझ्या उपक्रमाचे सात दिवस पूर्ण झाले आणि मला हा प्रयोग अधिक गांभीर्याने हातात घ्यावासा वाटायला लागला. पोहे, उपमा, डोसा, सँडविच, उकडलेली अंडी आणि पोळ्या उरलेल्या असल्या तर फोडणीची पोळी अशा सहा पदार्थांवर आमची न्याहारी बरेच महिने अडकलेली होती. सकाळी सर्वांना घरातून निघायची घाई आणि जेवणाचा डबा करणे यात न्याहारी या विषयात फार डोकं चालवणं होत नव्हतं आणि डोकं चालवावं असं वाटतही नव्हतं. सात दिवस हे केल्यानंतर मात्र हे नियमितपणे करणं शक्य असू शकेल असं वाटलं. व्हायरसचं संकट गेल्यावर आयुष्याला पाहिल्याइतकीच गती परत येईलच, परत सकाळची धावपळ सुरु होईलच हे लक्षात घेऊन पद्धतशीर प्लॅनिंग करावंसं वाटलं. उपक्रमाच्या स्वैर रूपाला काहीतरी नियम घालून घ्यावेसे वाटले आणि कागद पेन्सिल घेऊन उपक्रमाची नियमावली लिहिली. सर्वात प्रथम सकाळच्या घाईत पदार्थ करावे लागणार हे गृहित धरून पहिले काही नियम लिहिले.
१. पदार्थ हे कमी वेळात होणारे हवे. रात्री पूर्वतयारी करण्यासारखी असेल तर उत्तम.
२. पदार्थ फार कौशल्य लागणारे नसावे. सकाळच्या घाईत पदार्थ चुकणे यासारखे दुसरे संकट नाही.
३. पदार्थ साधे पण परिपूर्ण असावे.
४. जोडीला साधारणपणे चहा/दूध/एखादे फळ असते त्यामुळे भुकेचा अंदाज घेऊन केलेले असावे.
हे झाल्यावर काय स्वीकारार्ह आणि काय वर्ज्य, आणि त्याविषयी माझ्यापुरती काही संयुक्तिक कारणं, या बद्दल पुढचे नियम लिहिले
५. पदार्थ पारंपरिक हवे. नाविन्यपूर्ण पदार्थ करायची आणि खायची खूप हौस मलाही असली तरीही सकाळच्या न्याहारीला पारंपारिकच करायचं असा नियम केला. यात कुठेही नावीन्याला वाईट मानणे किंवा कर्मठपणा हा उद्देश नव्हता. आपले पारंपरिक पदार्थ किती सुग्रास आणि परिपूर्ण असतात त्याविषयी काही लिहायची गरज नाही. आमची पिढी आई-बाबा आणि सासू-सासऱ्यांबरोबर आजी-आजोबा, आत्या, काका, काकू, मावशी, मामा, मामी, इतकेच काय तर शेजारपाजारची माणसं, घरी कामाला येणाऱ्या मावश्या अशा बऱ्याच व्यक्तींच्या हातचं खाऊन आणि त्यांचे स्वयंपाकघरातले अनुभव ऐकत मोठी झाली. पदार्थ करताना आणि खाताना त्या माणसांची आठवण यावी आणि त्यांच्याकडून नकळत झालेल्या संस्कारांची उजळणी व्हावी म्हणून पारंपरिक पदार्थ करावेसे वाटले. "सिरिअल" नावाच्या फॅड मध्ये वाहत नाही गेली तरी आमची पिढी पारंपरिक पदार्थ सातत्याने न केल्यामुळे त्याबद्दल विसरत आहे. आम्ही हे पदार्थ नाही केले तर पुढची पिढी खोक्यातल्या सिरिअलला आहार मानून त्याच्या आहारी नक्कीच जाईल ही भीती आहे.
६. पदार्थ हे साधारणपणे घरात असणाऱ्या साहित्यातूनच केलेले असावे. हा उपक्रम "लॉकडाउन - मूड" प्रोजेक्ट असल्याने हा नियम आपोआप लागू झाला.
७. पदार्थ हे बाजारातून तयार आणलेल्या पदार्थांवर ब्रेड/ग्रॅनोला/कॉर्नफ्लेक्सवर आधारित नसावे.
उपक्रमात स्वतःचे पाककौशल्य थोडे वाढवणे असा उद्देश ही होताच. त्यामुळे हा नियम घालून घेतला.
८. पदार्थ करताना बेकिंग, रोस्टिंग - भाजणे, स्टीमिंग - वाफवणे आणि फ्रायिंग - तळणे, या सगळ्या पद्धतींचा आलटून पालटून वापर केलेला असावा.
९. पदार्थ हे उपक्रमापुरते मर्यादित न राहता १२ महिने परत परत करायला कंटाळा येणार नाहीत असे असावेत. हे असे असले तरच हा उपक्रम उपयोगी ठरला असं मानता येईल असं मला वाटलं.
१०. सर्व पदार्थ हे खरोखर वेगळे असावेत. म्हणजेच कमीतकमी फेरबदल करून केलेले नसावेत. उदाहरणार्थ - कांदेपोहे, बटाटेपोहे, मटार घालून केलेले पोहे - हे तीन प्रकार वेगवेगळ्या चवीचे असले तरीही या उपक्रमात ते तीन पदार्थ म्हणून मोजायचे नाहीत असा नियम केला.
उपक्रम किती दिवस चालवावा असाही एक प्रश्न मनात आला. त्याला उत्तर नव्हतं. जितके दिवस चालेल तितके दिवस चालवावा असं ठरवून पुढचे काम सुरु केले!




Comments