दलियाचा शिरा
- Ketaki
- May 28, 2020
- 1 min read
Updated: Oct 8, 2022
रव्याचा शिरा जिभेवर विरघळतो तर दलियाचा शिरा रेंगाळतो. रव्याचा शिरा नाजूक तर दलियाचा रांगडा! अन्नपदार्थ जिवंत होऊन बोलायला लागले की केव्हढी मजा येते!

गहू हे धान्य अखंड गहू, गव्हाचे पीठ, मैदा, रवा आणि दलिया - इतक्या स्वरूपांत आपण साधारणपणे वापरतो. गव्हाचे तीन भाग - ब्रॅन, एन्डोस्पर्म आणि जर्म. प्रत्येक भागाची गुणवैशिष्ट्ये, कार्ये आणि पोषणमूल्ये वेगळी. यातील एखादा भाग असणे किंवा नसणे यामुळे गव्हाच्या उत्पादनाचा रंग, चव आणि टिकाऊपणा या गोष्टी खूप बदलतात. एकोणिसाव्या शतकात मोठ्या प्रमाणावर पांढरा मैदा बनवला जाऊ लागला आणि त्याच्या रंगामुळे, टिकाऊपणामुळे, आणि गव्हाच्या पिठापेक्षा स्वस्त असण्यामुळे तो जगभर लोकप्रिय झाला. रवा म्हणजे गव्हापासून मैदा बनवण्याच्या प्रक्रियेतील एक उत्पादन. रव्यात ब्रॅन आणि जर्म याचा कमी किंवा नगण्य भाग असतो आणि दलिया मध्ये अखंड गव्हाची भरड असते. त्यामुळे रवा आणि दलिया यांचे पदार्थ खूप वेगळे लागतात.
आज केला दलियाचा शिरा, किंवा पॉरिज, किंवा खीर! काहीही म्हणा! प्रेशर कुकर मध्ये सुक्या खोबऱ्याबरोबर दलिया शिजवला. शिजल्यावर त्यात गूळ घालून प्रेशर कूकरचं झाकण वर अलगद ठेवलं आणि १० मिनिटे गरम दलिया मध्ये गूळ विरघळू दिला. थोडे बेदाणे घातले आणि वरून तूप घालून वाढला!
रव्याचा शिरा जिभेवर विरघळतो तर दलियाचा शिरा रेंगाळतो. रव्याचा शिरा नाजूक तर दलियाचा रांगडा! अन्नपदार्थ जिवंत होऊन बोलायला लागले की केव्हढी मजा येते!




Comments