ओट्सचं धिरडं
- Ketaki
- Jun 1, 2020
- 1 min read
Updated: Oct 8, 2022
...जे पीठ असेल ते द्या, जो मसाला असेल तो द्या, पीठ नसले तर कुठलं ही धान्य-कडधान्य द्या - धिरडं नक्कीच बनतं!

धिरडं/घावन/चिला/पूडा/पॅनकेक - सगळ्या देशांत, सगळ्या प्रांतात आणि सगळ्याच घरांमध्ये होणारे पदार्थ - करायला सोपे आणि चवीला कराल तितके उत्तम. असं वाचलं आहे की ५३०० वर्षांपूर्वीच्या एक मानवाचे (Otzi) अवशेष पॅनकेक सदृश पदार्थासह सापडले होते.
आपण खातो ते दुधातले घावन, ताकातले घावन, टोमॅटो ऑम्लेट ("ऑम्लेट म्हणजे अंड्याचेच हे ठरवणारे तुम्ही कोण" अशा भावनेतून टोमॅटो आणि काही पिठं घालून केलेल्या प्रकाराला टोमॅटो ऑम्लेट असं नाव देऊन प्रचलित करणाऱ्या व्यक्तीचं खूपच कौतुक वाटतं!), डोसा, वेगवेगळ्या धान्य-कडधान्यांचं धिरडं, गोड पंजाबी पूडा आणि इतर प्रांतातले कितीतरी असे प्रकार आहेत जे तव्यावर घालून झटपट होतात. जे पीठ असेल ते द्या, जो मसाला असेल तो द्या, पीठ नसले तर कुठलं ही धान्य-कडधान्य द्या - धिरडं नक्कीच बनतं!
आज सकाळी ब्रेकफास्ट साठी हा "प्राचीन" पदार्थ केला. इन्स्टंट ओट्स आणि बेसन ताकात १५ मिनिटं भिजवून, तव्यावर जाडसर पसरलं. त्यावर पातीचा कांदा, कोथिंबीर आणि मिरची रचून, झाकण घालून वाफ दिली. खाताना बरोबर हिरवी चटणी घेतली.
कुठलाही पदार्थ मऊ किंवा जाळीदार करण्यासाठी भिजवलेल्या पिठात हवेचे बुडबुडे निर्माण करणे याला leavening म्हणतात. डोसा, आंबोळी या प्रकारात leavening साठी पीठ नैसर्गिक यीस्टचा वापर करून आंबवले जाते तर इंग्लिश पॅनकेक मध्ये अंडी आणि बेकिंग सोडा घालून हे साध्य होते. काही ठिकाणी यासाठी वरून घातलेल्या यीस्टचा ही वापर होतो. आपण यासाठी ताक आणि बेकिंग सोडा हि जोडी सुद्धा वापरु शकतो. परंतु leavening हे सर्व धिरड्यांमध्ये आवश्यक अजिबातच नसतं. ओट्सचं हे धिरडं leaven केल्याशिवायही छान मऊ होतं.




Comments