थालीपीठ
- Ketaki
- Jul 26, 2020
- 1 min read
Updated: Oct 8, 2022
थालीपीठ तव्यावर लावलं की घरभर असे काही सुगंध दरवळतात की घरातली माणसं अगदी टीव्ही-इंटरनेट सोडून न बोलावता खायला येऊन बसतात

आज आपण भारतीय जगभर आहोत. आपले बरेचसे खाद्यपदार्थ देशाबाहेर सहज मिळतात. पण आपल्या देशातल्या काही खास सोयी नाही मिळत - उदाहरणार्थ कोपऱ्याकोपर्यावरची चक्की. त्यामुळे आपल्या स्वतःच्या स्वयंपाकघर स्वरूपी लॅबोरेटरी मधल्या मिश्र धान्य पिठांच्या गुप्त पाककृतींची परंपरा मोडते. हे याच प्रमाणात घालावं, ते एव्हढंच भाजावं आणि चक्कीवाल्याने वैयक्तिक सूचनेनुसार कमी अधिक जाड दळावं - लहानपणापासून सवयीची झालेली ती अद्वितीय रसायनं मिळेनाशी होतात आणि आयुष्याचा एक भाग हरवल्यासारखा वाटतो. फारंच भारी होतंय, नाही? करणार काय? थालीपीठाची ताजी भाजणी नाही हो करता येत इथे!
भारतातून आलेल्या कोण्या भल्या व्यक्तीने तयार भाजणी "ऑन डिमांड खाऊ" म्हणून आणली होती. त्याची शेवटची दोन पाकिटं शिल्लक होती. आता या वायरसरावांनी पिच्छा सोडल्याशिवाय ती परत मिळणार नाहीत या दुःखात आज न्याहारीला थालिपीठं केली. थालीपीठ तव्यावर लावलं की घरभर असे काही सुगंध दरवळतात की घरातली माणसं अगदी टीव्ही-इंटरनेट सोडून न बोलावता खायला येऊन बसतात. म्हशीच्या दुधापासून केलेलं धष्टपुष्ट लोणी नसेल इथे पण जे काही दही आणि व्हाईट बटर उपलब्ध असेल त्याबरोबर ते थालीपीठ खाताना अमर्याद आनंद होतो.
असं असतं तरी काय या थालीपिठात? तांदळातुन आलेलं समाधान, ज्वारी-बाजरीतून आलेला अस्सल देशी रांगडेपणा, डाळींतून आलेली तृप्ती, धने-जिर्यातून आलेला ताजेपणा आणि कांद्यातुन आलेली भूमातेशी जवळीक! सर्वप्रथम कुणाला सुचला असेल असा अद्भुत पदार्थ?




Comments