बटाट्याचे पराठे
- Ketaki
- Jun 21, 2020
- 2 min read
Updated: Oct 8, 2022
दुसर्याने त्याच्या पद्धतीने केलेलं अन्न हे त्या माणसाचा आदर राखून, त्याला चूक किंवा बरोबर असा शिक्का न मारता, नाक न मुरडता खाता यायला ही हवंच

आज केले बटाट्याचे स्टफ्ड पराठे. हा पदार्थ आमच्याकडे खूपच आवडतो. कधी त्यात आलं, मिरची आणि लसूण तिन्ही असतं, कधी नुसतं आलं. कधीतरी त्यात कोथिंबीर वाटून घातली कि ते छान हिरवट दिसतात. कधीतरी कणकेत मेथी घालून आत बटाटा असा मेथी - बटाटा पराठा ही होतो. बरोबर लोणचं आणि दही, किंवा काकडीची कोशिंबीर किंवा चटणी असली की झालं.
हॉटेल मध्ये किंवा धाब्यावर मिळणारे पराठे ज्याला बऱ्याच वेळा मैद्याचं आवरण असतं आणि घरगुती आपल्या आवडीनुसार केलेले मऊसूत पराठे दोन्हीही तितकेच आवडतात. काही ठिकाणी कणकेबरोबर उकडलेला बटाटा मळून पराठे केलेले बघितले आहेत. पूर्वी माझ्या ऑफिस मध्ये एका मैत्रिणीची आई अतिशय पातळ स्टफ्ड पराठे करून तिच्या डब्यात द्यायची. असं वाटायचं कि त्या काकूंना पातळ पराठे लाटायची कुठलीतरी गूढ विद्या अवगत आहे. एकदा कुणाकडेतरी बटाट्याच्या पराठ्यांची ऑर्डर दिली होती तेव्हा त्या बाईंनी चक्क किसलेले कच्चे बटाटे कणकेत कालवून त्याच्या पोळ्या करून पाठवल्या होत्या. जे होतं ते छान लागत होतं परंतु ते मनात असलेले बटाट्याचे पराठे मात्र नव्हते.
खायचा पदार्थ हा "मनात असलेला पदार्थ" आहे का नाही यावर तो चांगला झाला का नाही हे बऱ्याच वेळा ठरतं त्यामुळे चांगल्या पदार्थाची व्याख्या करणंच फार अवघड असतं. उसळीत गुळ असावा का नाही? हिरवी मिरची वापरावी कि लाल; का लाल तिखटाची पूड वापरावी? पुरणपोळी ही मैद्याची असावी का कणकेची? पुरण हे गुळाचं असावं का साखरेचं; तुरीच्या डाळीचं का चण्याच्या डाळीचं? तिळगुळ हा गुळाचा असावा का साखरेचा? कुठल्याशा फोडणीत जिरं असावं का नाही? या प्रश्नांना सरळ उत्तरं नसतातच. प्रत्येक जातीत, प्रत्येक घरात आणि देशाच्या प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या पद्धती. कधी परंपरा म्हणून तर कधी भौगोलिक स्थिती मुळे. चार ठिकाणी, चार गावी किंवा चार घरचं अन्न मोकळ्या मनाने खाल्लं; आपल्याला नाही आवडलं तरी त्या घरातल्या माणसांना अतिशय आवडलं हे बघितलं कि आपोआप दुसऱ्याची मतांचा आदर राखणे, सहिष्णुता हे गुण निर्माण होतात असं मला वाटतं. मुळात अन्न हे एका विशिष्ट पद्धतीने केलेलं असेल तरंच ते चांगलं हा विचारंच खूप संकुचित वाटतो. आपल्या घरी जरूर आपल्याला आवडेल ते, आवडेल तसं करून खावं. परंतु दुसर्याने त्याच्या पद्धतीने केलेलं अन्न हे त्या माणसाचा आदर राखून, त्याला चूक किंवा बरोबर असा शिक्का न मारता, नाक न मुरडता खाता यायला ही हवंच.
पूर्वी आपल्या अनेक घरांमध्ये "पानात जे प्रथम वाढलं जाईल ते खाल्लंच पाहिजे, आवडेल ते अजून मिळेल" हा नियम असायचा. घराबाहेर असलं तरी चांगलं असेल अशाच ठिकाणी खायची पद्धत होती त्यामुळे घराबाहेरही हा नियम लागू व्हायचाच. हा संस्कार झालेले कधी लग्न/पार्टी बफे मध्ये भरमसाठ अन्न घेऊन वाया घालवताना दिसत नाहीत. जे योग्य वाटेल ते थोडंसं घेऊन, आवडलं तर आणखी घेतात, नाही आवडलं तरी थोडंसंच असल्याने संपवतात. अन्नाचा आदर राखतात. काही व्यक्तींमध्ये मात्र अन्नाविषयी फार दुराग्रह दिसतो. प्रत्येक गोष्ट एका विशिष्ट पद्धतीनेच व्हायला हवी अन्यथा ती खाण्यायोग्यच नाही असा बाणा असतो. दूध-भात-लोणचं याशिवाय रात्रीचं जेवण होत नाही म्हणून हॉस्टेल वर राहणं अशक्य झाल्याने शिक्षण सोडलेल्या एकीबद्दल ऐकलं आहे. स्वयंपाक, खाद्यसंस्कृती हे विषय कितीही जिव्हाळ्याचे असले तरी वेळप्रसंगी अन्नाकडे आवडी-निवडींपलीकडे केवळ एक मूलभूत गरज म्हणून बघायचा संस्कार व्हायला हवा. अन्नग्रहणाकडे एक कर्तव्य म्हणून बघता यायला हवं. उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म!




Comments