top of page

आप्पे

  • Ketaki
  • Jun 11, 2020
  • 2 min read

Updated: Oct 8, 2022

आम्ही पातीचा कांदा दोन वेळा "वसूल" करतो...



आज सकाळी फ्रिजमध्ये थोडं इडलीचं पीठ उरलेलं होतं. त्यात किसलेलं गाजर, कांद्याची पात आणि आलं-मिरची घालून आप्पे केले. कांद्याच्या पातीमुळे आप्पे परतताना अतिशय छान सुगंध दरवळतो.


मुंबईत असताना मला कांद्याचे ४ प्रकार माहिती होते - लाल कांदे जे आपण टोपलीत भरून ठेवतो, अलिबागचे वेण्यांमध्ये बांधलेले पांढरे कांदे, सांबारात घालायचे लहान कांदे आणि कांद्याची पात. त्यापलीकडे माहिती तर नव्हतीच परंतु टोपल्यांमध्ये बटाट्यांबरोबर निमूटपणे बसलेल्या आणि बाहेर आल्यावर रडवणाऱ्या कांद्यांबद्दल कधी फार विचार केलेलाही आठवत नाही. हॉंगकॉंगला आल्यावर मात्र पहिले काही दिवस कांदा हे कोडं सोडवण्यात गेले. एक तर इथे वेट मार्केट मध्ये जे कांदे मिळतात ते आपल्याकडच्या कांद्यांपेक्षा काही पट मोठे असतात. भारताबाहेर राहिलेल्या सर्वांनाच ते परिचित असतात. मला मात्र ते प्रथमच दिसले आणि फार मजा वाटली. वेळेला पाव कांदा आरामात पुरतो. गम्मत म्हणजे श्रीलंकेत या मोठ्या कांद्याला "बॉम्बे ओनियन" म्हणतात असं ऐकलं. या मोठ्या कांद्यात इथे दोन प्रकार मिळतात - पिवळट/पांढरा कांदा आणी जांभळा कांदा. दोन्ही अतिशय पाणीदार असतात आणि त्यामुळे सहजासहजी परतले जात नाहीत. चवीला हे कांदे छान असतात पण मुंबईतल्या लाल कांद्यांपेक्षा निश्चितच वेगळे. पदार्थाचा रंगही कांद्याप्रमाणे बदलतो. सांबारचे लहान कांदे ही इथे मिळतात आणि त्याला शॅलट (shallot) म्हणतात. हे कांदे जमिनीखाली गुच्छासारखे येतात आणि आकाराने खूप लहान असतात. त्यांची चव आपल्याकडच्या लाल कांद्यांसारखी झणझणीत असते. कांद्याच्या पातीचे दोन प्रकार इथे मिळतात. एका जातीला scallion (स्कॅलियन) म्हणतात. कांद्याची ही जात गमतीशीर असते. या कांद्याला म्हणण्यासारखे मोठे कांदे येतंच नाहीत. पानांसाठीच याचा वापर होतो. दुसरी जात म्हणजे स्प्रिंग ओनियन. स्प्रिंग ओनियनचे कांदे लहान कांद्यांइतपत मोठे असतात.



मी हाँगकॉंगला आल्यापासून रोजच्या स्वयंपाकात कांद्याची पात खूपच सढळ हाताने वापरते. कारण इथे कुठलीही भाजी विकत घेतली की भाजीवाले थोडीशी कांद्याची पात देतातच. आपल्याकडे काहीजण जसं थोडीशी मिरची-कोथिंबीर देतात तसंच. आपण कोथिंबीर वापरतो तसं इकडच्या स्वयंपाकात पातीचा कांदा गार्निश म्हणून वापरतात. आम्ही पातीचा कांदा दोन वेळा "वसूल" करतो एकदा त्याची पात वापरतो आणि मग कोवळे कांदे पाण्यात ठेवून आठवड्याभराने नवीन पानं वापरतो! ही पानं आपल्या कुठल्याही पदार्थाला कांद्याचाच पण अगदी हलका स्वाद देतात. ताजी पानं असल्याने ती लागतातही रुचकर.

Comments


Send us a message
and we’ll get back to you shortly.

Thanks for submitting!

© 2022 by Grains, Pebbles, Flowers. Proudly created with Wix.com

bottom of page