top of page

मुगाची सुटी डाळ

  • Ketaki
  • May 25, 2020
  • 1 min read

Updated: Oct 8, 2022

...गच्च भरलेल्या गुजराती ताटातलं काय खाऊ आणि काय नको असं होतं आणि पोट तुडुंब भरलं तरी आपण सर्व पदार्थांना पुरेसा न्याय दिला नाही असं वाटत राहतं.




गुजराती स्वयंपाकात ताकाच्या कढी बरोबर मुगाची सुकी डाळ - મગ ની છૂટી દાળ - हा प्रकार करतात. त्या गच्च भरलेल्या गुजराती ताटातलं काय खाऊ आणि काय नको असं होतं आणि पोट तुडुंब भरलं तरी आपण सर्व पदार्थांना पुरेसा न्याय दिला नाही असं वाटत राहतं. आज ब्रेकफास्टला मुगाची सुकी डाळ केली. म्हटलं या इतक्या चविष्ट आणि परिपूर्ण पदार्थाला आपल्या यादीत बसवावं.


रात्री डाळ भिजत घातली आणि सकाळी उपसून कढईत अगदी साधी फोडणी, आलं-मिरची, मीठ आणि किंचित पाणी घालून, झाकण ठेवून शिजवली. पूर्ण शिजेल पण दाणा अखंड राहील अशा प्रकारे ही शिजवतात. शिजत आल्यावर थोडी साखर घातली. शिजल्यावर वरून लिंबाचा रस, खोबरं आणि कोथिंबीर घालून वाफाळलेली वाढली.


मूग हे कडधान्य आणि त्याची पिवळी डाळ आशिया खंडात सर्वत्रच वापरले जातात. मुगाच्या डाळीची खिचडी, मुगाच्या डाळीचा गोड हलवा, मूगभजी, कचोरी - आपल्याकडे असंख्य पदार्थ आहेतच, परंतु दक्षिण-पूर्व आशिया खंडातही याचे बरेच प्रकार केलेले दिसतात. मुगाचे मोठे मोड stir-fries आणि सॅलड्स मध्ये आपण बघतोच, शिवाय मुगाची गोडसर पेस्ट बन्स मध्ये भरलेली आढळते, दुकानात मुगाचे सेलोफेन (cellophane) नूडल्स नावाचे पारदर्शक नूडल्स मिळतात जे नुसते गरम पाण्यात भिजवले की शिजतात, आणि असे इतर अनेक प्रकार असतात.


हॉंगकॉंग मध्ये ड्रॅगन बोट फेस्टिवल नावाचा एक धमाल सण असतो. त्यादिवशी तांदुळाच्या पारित सारण भरून, बांबूच्या पानात वाफवलेला zongzi नावाचा पदार्थ खातात. सारण अनेक प्रकारचं असतं, त्यातलं एक मुगाचं ही असतं.


Comments


Send us a message
and we’ll get back to you shortly.

Thanks for submitting!

© 2022 by Grains, Pebbles, Flowers. Proudly created with Wix.com

bottom of page