मऊभात - मेतकूट
- Ketaki
- May 18, 2020
- 2 min read
Updated: Oct 8, 2022
...अधिक गुंतायचं ठरवलंच तर अशा गोष्टी आठवतात ज्या आठवणीत होत्या तेच माहिती नसतं! एरवी कुठे असतात या आठवणी? सुगंध म्हणजे आठवणींची तिजोरी उघडण्याची किल्ली!
उपक्रमाचा दुसरा दिवस रविवारचा होता. रविवार म्हणजे weekly कामं, बऱ्यापैकी आळस, तासा-दोन तासांची वामकुक्षी आणि शांतपणा. आणि हो! Comfort food सुद्धा!

"मऊभात - मेतकूट" - माझं टाइम मशीन. सकाळी उठून एका बाजूला चहा करायला घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला भरपूर पाणी उकळायला लावायचं. त्यात तांदूळ धुवून घालायचे आणि हलकं झाकण घालून सुगंध अनुभवत मऊभात होण्याची वाट बघायची. भात झाला की त्यावर मीठ, भरपूर मेतकूट आणि तूप घातलं कि टाइम मशीन आपलं काम सुरु करतं. बरोबर कधीतरी पोह्याचा पापड किंवा मिरगुंडं असली की टाइम मशीन अजून वेगळ्या डायमेन्शन्स दाखवतं.
बरणीत निर्विकार बसलेलं मेतकूट गरम भातावर पडताक्षणी सुगंधी होतं आणि आठवणी गडगडायला लागतात. शांत आजोळ, कौलारू घर, रहाटाचा आवाज, टोपलीभर अनंताची फुलं, झाड गदागदा हलवून आमच्यासाठी चाफ्याची फुलं पाडणारा एक मामा, आजोबांची शिस्त, ओटीवरची गजबज, हक्काने लाड करून घेणारी लहान मावसबहीण, मावशीचा सळसळता उत्साह, सतत कामात असलेली तरीही अत्यंत प्रेमाने आमचं करणारी आजी, मामांबरोबरच्या भेंड्या आणि खेळ, नव्याकोऱ्या मामीबरोबर बाजेवर बसून गप्पा मारत खाल्लेले आंबेच आंबे... अधिक गुंतायचं ठरवलंच तर अशा गोष्टी आठवतात ज्या आठवणीत होत्या तेच माहिती नसतं! एरवी कुठे असतात या आठवणी? सुगंध म्हणजे आठवणींची तिजोरी उघडण्याची किल्ली!
चित्र काढू शकणाऱ्यांची मला कमाल वाटते. चित्रकला ही हाताच्या बोटात असते का डोळ्यात असते? ज्या गोष्टींमुळे चित्र realistic वाटतं त्या मला दिसतच नाहीत की काय अशी शंका येते, हातातून ते कागदावर उमटणं तर फार दूर राहिलं!

माझ्या एका गुणी मैत्रिणीबरोबर, संध्या कुमठेकर बरोबर, बऱ्याच वर्षांनी एकत्र काही करण्याची संधी मिळाली. पूर्वी आम्ही एकत्र गणिताच्या पुस्तकांचं आणि प्रश्नपत्रिकांचं संपादन करायचो, आज दोघीही वेगळंच काहीतरी करत असतो. माझ्या आठवणीतलं आजोळ तिला दिसलं आणि तिने वेळात वेळ काढून ते दोन दिवसात रेखाटलं. काळाआड गेलेले छान दिवस परत येत नाहीत. पण त्या काळातली आपल्या आजूबाजूची काही छान माणसं मनात तो काळाचा कप्पा जसाच्या तसा ठेवतात आणि नातं जपतात तेव्हा खूप बरं वाटतं.
इथे हॉंगकॉंग मध्ये बऱ्याच वेळा सकाळच्या वेळी शेजारच्या घरांतून rice congee चा सुगंध येतो. मऊभातच तो! त्याचे साथीदार फक्त मेतकुटापेक्षा वेगळे. South-East Asia मध्ये फिरताना खिशात एक मेतकुटाची पुरचुंडी ठेवावी. तिकडचे स्थानिक पदार्थ खाऊन कंटाळा आलाच तर rice congee वर एक बटरचं मिनीपॅक आणि मेतकूट घातलं कि हवं ते खाल्ल्याचं समाधान मिळेल
Comments