top of page

प्रेशर कुकर

  • Ketaki
  • Jul 5, 2020
  • 3 min read

Updated: Oct 8, 2022

प्रेशर कुकरचा योग्य वापर कसा असावा? शिट्टी वाजूच नये असा!

ree

पाकशास्त्र - स्वयंपाकातील शास्त्र/विज्ञान - हा विषय खूप मनोरंजक होऊ शकतो. स्वयंपाकघरातील सर्व आधुनिक उपकरणं शास्त्रावर आधारित असतात. यातल्या बऱ्याच उपकरणांमागच्या शास्त्राचा वर वर अभ्यास शालेय विज्ञानातच होतो. शालेय विज्ञानाचा वापर घरात होताना बघितला तर त्यात रस निर्माण होतो आणि ते अधिक चांगल्या प्रकारे कळतं. आजूबाजूच्या घडामोडींकडे बघण्याचा वैज्ञानिक दृष्टीकोण आपोआप निर्माण होतो.


मी हॉंगकॉंगला राहायला आले आणि पहिल्याच आठवड्यात माझ्याच चुकीमुळे आमच्या नव्या कोऱ्या प्रेशर कुकरचा वॅल्व उडाला! या परक्या देशात फ्राय पॅन स्वरूपी तवे, वोक स्वरूपी कढया, सॉसपॅन स्वरूपी पातेली असा सगळं मुबलक मिळत होतं पण प्रेशर कूकरचा वॅल्व सोडाच, प्रेशर कुकर ही सहज मिळेना! जवळ जवळ महिनाभर प्रेशर कूकर शिवाय स्वयंपाकघर कसंबसं चालवलं आणि जेव्हा तो हातात परत आला तेव्हा खरी रात्रीची शांत झोप लागली.


भारतीय स्वयंपाकघर आणि प्रेशर कुकरचं नातं भयंकर घट्ट असतं. प्रेशर कुकर का वापरतात? १. "योग्य प्रकारे प्रेशर कुकर वापरल्यास" अन्न लवकर शिजतं २. "योग्य प्रकारे प्रेशर कुकर वापरल्यास" गॅस वाचतो ३. "योग्य प्रकारे प्रेशर कुकर वापरल्यास" अन्नाची पोषणमूल्य जास्त राखली जातात


आता हे "योग्य प्रकारे प्रेशर कुकर वापरल्यास" परत परत कशासाठी? कुकर तो! तीन पिढ्यांपासून प्रत्येक घरात वापरला जातोय. त्यात काय मोठं योग्य आणि अयोग्य?


राजमा शिजवायला कमीतकमी १५ शिट्ट्या लागतात असं काहीदिवसांपूर्वी कुठेतरी वाचलं आणि धक्का बसला. तुरीची डाळ किती शिजवावी असा प्रश्न आला की ३/६/८ अश्या शिट्ट्यांचं प्रमाण बऱ्याच बायका सांगतात. पण प्रेशर कुकरचा योग्य वापर कसा असावा? शिट्टी वाजूच नये असा!


पातेल्यात पाणी १००ºC ला उकळतं. त्यात जर डाळ शिजण्याकरता घातली तर ती डाळ ही १००ºC लाच शिजते. पाण्याचं तापमान वाढवता आलं तर डाळ लवकर शिजू शकते. पण पाण्याचं तापमान कसं वाढवणार? १००ºC च्या वर तर पाण्याची वाफ होते! याचं उत्तर आठवी-नववीत आपण शिकलेल्या Gas Laws मध्ये सापडतं. हवेचा दाब वाढवला तर पाणी उकळायला १००ºC पेक्षा जास्त तापमान लागतं. प्रेशर कुकर मध्ये हवेचा दाब वाढवून पाण्याचे तापमान १२१ºC पर्यंत वाढवलं जाऊ शकतं. त्यामुळे आतमधील पदार्थ खूप लवकर शिजतो.

कुकरची शिट्टी जितक्यावेळा वाजते तितक्यावेळा कुकर वाफ बाहेर फेकून आपल्याला ओरडून सांगत असतो, "मला अधिक गरम करू नका, माझ्या आत पुरेसा दाब निर्माण झालाय आणि तुमचे अन्न मस्तपैकी शिजत आहे". कुकरच्या आतला दाब अति वाढला तर कुकरचा वॅल्व वितळू शकतो किंवा स्फोटही होऊ शकतो. परंतु कुकर शिट्टी वाजवतो, वाफ बाहेर सोडतो आणि आतमधील दाब नियंत्रित करतो. एकदा एक शिट्टी झाली की आपण गॅस आणि ज्योत कमी करून कुकरचे तापमान नियंत्रित करणं अपेक्षित असतं. मग कुकर योग्य प्रमाणात दाब निर्माण करून आतमधले तापमान १२१ºC इतके ठेवू शकतो आणि पदार्थ लवकर शिजतो.


परंतु आपण जर शिट्ट्या मोजायच्या ठरवल्या आणि बाहेरील ज्योत कमी नाही केली तर वारंवार शिट्ट्या होऊ लागतात, वारंवार वाफ बाहेर फेकली जाते आणि मग कुकरला दाब आणि आतले तापमान नियंत्रित करणे शक्य होत नाही. आणि मग ज्या तत्परतेने अन्न शिजणे शक्य असते त्या तत्परतेने ते शिजत नाही. आता राजमा सारखे धान्य शिजवताना बिचारी शिट्टी १५ वेळा वाजली तर तो टणक राजमा लवकर कसा बरं शिजायचा?


मग नेमकं करायचं काय? कुकर वजनाशिवाय गॅस वर तापायला ठेवायचा. वाफ बाहेर येताना दिसली की वजन ठेवायचं. एक शिट्टी झाली की ज्योत कमी करायची आणि ते झाल्यावर मग शिट्ट्यांऐवजी वेळ मोजायचा. किती वेळ? आतमध्ये अन्नपदार्थ कोणता आहे, किती आहे आणि कुकर किती मोठा आहे यावर ते ठरतं. साधारणपणे फक्त भात असेल तर २-५ मिनिटात होतो, मुगाची डाळ ७-८ मिनिटात शिजते, तुरीची डाळ १०-१२ मिनिटात शिजते आणि राजमा सारखी कडधान्य १५-२० मिनिटात शिजतात. आपण अनुभवाने या वेळांचा अंदाज बंधू शकतो. नवीन कूकर बरोबर जे माहितीपत्रक मिळतं त्यातही ही सगळीच माहिती असते. बऱ्याच वेळा तांदूळ-डाळीच्या जातीवर आणि दर्जावरही पण ही वेळ ठरते त्यामुळे थोडं flexible रहावं लागतं.


कुकर हा असाच वापरत असाल तर उत्तम! पण जर असा वापरत नसाल तर एकदा असा प्रयत्न जरूर करून बघा.

"तीन पिढ्या शिट्ट्या मोजत आलो आणि उत्तम स्वयंपाक केला. तुमच्या या विज्ञानावाचून आमचं काही अडलं नाही." किंवा "आमचं सगळं छान चाललंय. माझा स्वयंपाक उत्तम होतो. आम्ही कशासाठी हे असले बदल करायचे?"

१. इंधन वाचवण्यासाठी - ज्योत विनाकारण मोठी ठेवली तर अधिक इंधन खर्ची पडते - गॅस बिल वाढते/ सिलेंडर लवकर संपतो

२. प्रत्येकवेळी शिट्टी वाजते तेव्हा कुकर खूप गरम वाफ बाहेर फेकतो. अनावश्यक असलेल्या अनेक शिट्ट्यांमुळे स्वयंपाकघर आणि पर्यायाने घराचे तापमान वाढते. पंखा-AC अधिक वापरावा लागतो आणि इलेक्ट्रिसिटीचे बिल वाढते - या सगळ्याचा परिणाम जगाच्या तापमानावरही होतो. प्रत्येक घरातली प्रत्येकी अनावश्यक शिट्टी ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावत असते.

३. वेळ वाचवण्यासाठी - अन्न शिजायला निश्चितच वेळ कमी लागतो. याचा परिणाम म्हणून पोषणमूल्य वाया जात नाहीत.


स्वयंपाकघरातील उपकरणं जितकी सुलभ रित्या उपलब्ध होतात तितक्या सहज ती समजावून दिली/समजून घेतली जात नाहीत. २-३ पिढ्यांपूर्वी स्वयंपाक उपकरणांशिवायही उत्तम होत होता, उपकरणं चुकीच्या पद्धतीने वापरली तरीही तो उत्तम होतोच कारण पाक"कला" ही शेवटी करणाऱ्याची असते. परंतु पाककलेला शास्त्राची जोड दिली तर नुकसान काहीही होत नाहीच, उलट सर्वप्रकारे हिताचेच ठरते.

Send us a message
and we’ll get back to you shortly.

Thanks for submitting!

© 2022 by Grains, Pebbles, Flowers. Proudly created with Wix.com

bottom of page