इडली आणि सांबार
- Ketaki
- Jun 28, 2020
- 2 min read
Updated: Oct 8, 2022
अन्नाविषयी असलेल्या समजुती, खाद्यसंस्कृतीविषयी असलेली आस्था या गोष्टी बऱ्याच गुंतागुंतीच्या असतात

इडली आणि सांबार - दक्षिणेतली मंडळी म्हणतात हा पदार्थ फक्त सकाळच्या न्याहारीलाच केला जातो. पण इतर भारतीय मात्र ब्रेकफास्ट, लन्च, डिनर - केव्हाही इडली सांबार समोर दिसलं की ताव मारतात!
आपल्या आणि इतर संस्कृतींमध्ये कधी कुठला पदार्थ खावा याबद्दल बरीच ठाम मतं असतात. काही जण "आमच्याकडे - म्हणजे आमच्या घरी/माहेरी/सासरी/जातीत/धर्मात असंच असतं" म्हणून त्यांचं मत मांडतात, तर काही मंडळी त्याला कार्ब/प्रोटीन/फॅट/मेटाबोलिसम अशा संज्ञा लावून आपलंच ते कसं बरोबर असं सांगतात. काही जण अमुक वेळी तमुक खाल्लं कि सूर्यकिरण/चंद्रकिरण असंही काही काही तितक्याच ठामपणे सांगतात. बरोबरच असेल सगळं, माझा काही या विषयांचा अभ्यास नाहीच! मला मात्र असं वाटतं कि कुठला पदार्थ कधी खावा याबद्दलच्या मतांना, वैयक्तिक पातळीवर तरी कंडिशनिंग किंवा साध्या शब्दात लहानपणापासून लागलेल्या सवयी इतकंच खरं कारण असतं.
कुठल्याही जागेची खाद्यसंस्कृती तिथले हवामान, तिथे प्राकृतीकरित्या उपलब्ध असणारी सामग्री, तिथल्या मूळ माणसांचा पोटापाण्याचा व्यवसाय आणि त्यांची अनुवांशिक जडणघडण यावर शेकडो वर्षांच्या काळात विकसित झालेली असते. तिथली माणसं त्या खाण्याच्या सवयींना पिढ्यानपिढ्या सरावतात - मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही पातळ्यांवर. आपलं तेच आणि तेव्हढंच चांगलं असा समज करून घेतात. मग त्यांचं स्थलांतर झालं, व्यवसाय बदलला, सहज मिळणारी सामग्री बदलली तरी आपलं धरून बसतात. जर बदल केलाच तर तो बऱ्याच वेळा सोय आणि चव यांवर आधारित असतो आणि कधीकधी तो तितकासा मानवत नाही. मग कोणीतरी म्हणतं की "आपलं होतं तेच बरोबर होतं" आणि ते पटतं. आपण आहोत त्या जागी, त्या स्थितीत, त्या व्यवसायाला योग्य आहार ठरवणं सोपं नसतं कारण ते करायला एका मातीत, एका व्यवसायात, एका जीवनपद्धतीत परत काही "शे" वर्ष रुजावं लागतं!
अन्नाविषयी असलेल्या समजुती, खाद्यसंस्कृतीविषयी असलेली आस्था या गोष्टी बऱ्याच गुंतागुंतीच्या असतात असं मला वाटतं. तर्कशुद्ध विचार करायला घेतला तर काही गोष्टींविषयी आपले समज तितकेसे बरोबर नसतात हे समजतं. तरीही त्यात गुंतणं, आणि आपल्या खाद्यसंस्कृतीविषयी अभिमान बाळगणं हा पण संस्कृतीचाच भाग नाही का?




Comments