पोहे
- Ketaki
- Jul 22, 2020
- 2 min read
Updated: Oct 8, 2022
सुपरमार्केट मध्ये असलेले, छान छान दिसणारे आणि लागणारे कुठलेही इन्स्टंट पदार्थ असोत; आपण नेहमीच म्हणू शकतो - "त्यात काय नवीन?

न्याहारीसाठी वेगवेगळे पदार्थ करायच्या नादात आपले सर्वांचे आवडते पोहे मात्र करायचे राहून गेले होते. आज त्यांचा नम्बर लागला! कांदे पोहे, बटाटे पोहे हे दोन प्रकार मी करतेच पण आज लसूण आणि वांग्याचे काप घालून पोहे केले. याने पोह्यांना खूप वेगळी चव येते. हे मी आईकडून शिकले आणि आई, आजी कडून!
इन्स्टंट फूड म्हणजे पटकन शिजणारं, प्रसंगी न शिजवता खाता येईल असं अन्न. आज नूडल्स, स्वीटन्ड सिरीयल असे जे भरपूर मीठ आणि साखर घातलेले रेडी-टू-ईट पदार्थ मिळतात त्या संदर्भात हा शब्द वापरला जातो. आपल्याकडेही काही पारंपरिक इन्स्टंट फूड्स आहेत. चुरमुरे, लाह्या आणि पोहे हे अन्नपदार्थ त्यातलेच काही.
आपण अन्न हे पचायला सोपं व्हावं आणि त्यातली पोषक तत्व आपल्याला उपलब्ध व्हावीत म्हणून शिजवतो. पदार्थ मऊ व्हावेत, चविष्ट व्हावेत हे ही उद्देश असतात. धान्यांच्या बाबतीत आपण भिजवणे, मोड आणणे, भाजणे, पीठ करणे, आंबवणे आणि शिजवणे या वेगवेगळ्या प्रक्रिया करत असतो. पोहे हा पदार्थ यातल्या काही प्रक्रिया घडल्यानंतरच आपल्या घरी येतो आणि त्यामुळे त्यापुढे तो कमीत कमी प्रक्रिया करून आपल्याला खाता येतो.
भात (साळी/भातकण) काही तास भिजवून, मग सुकवून, एका विशिष्ट तापमानाला भाजतात आणि मग त्याला मशीन मध्ये दाब देऊन, त्याची सालं काढून त्याचे पोहे केले जातात. आपल्याकडचे मक्याचे पोहे किंवा आता मिळणारे प्लेन इन्स्टंट ओट्सही साधारण असेच केले जातात. यात कमी अधिक फरकाने धान्याला वाफवणे ही प्रक्रिया होते. त्यामुळे ती धान्ये दाब देऊन पोहे करण्यायोग्य मऊ होतातच पण महत्वाचं हे की ती शिजतात. त्यामुळे पोहे आपल्या हातात पोचतात तेव्हा ते आपल्यासाठी फार सोपे होऊन येतात. फोडणी करून मऊ कांदे/बटाटे पोहे, तेलावर परतून किंवा तेलात तळून चिवडा हे पदार्थ असतातच. पण ना शिजवता नुसते तेल-तिखट-मीठ-पोहे, दडपे पोहे, कोळाचे पोहे, दूध-गूळ-पोहे ही खाता येतात.
थोडक्यात काय तर सुपरमार्केट मध्ये असलेले, छान छान दिसणारे आणि लागणारे कुठलेही इन्स्टंट पदार्थ असोत आपण नेहमीच म्हणू शकतो - "त्यात काय नवीन?"




Comments