न्याहारी आणि चहाचा कप
- Ketaki
- Aug 2, 2020
- 2 min read
Updated: Oct 8, 2022
जितकी घरं वेगळी तितके चहा वेगळे आणि जितके स्वभाव तितक्या चहाच्या पद्धती!

न्याहारी हा विषय चहाच्या कपाशिवाय पूर्ण होणं शक्य नाही. आपल्यापैकी बऱ्याच जणांना चहा प्यायल्याशिवाय सूर्योदय झाला असं वाटतच नसेल. सकाळची घाई, एका पाठोपाठ एक कामांची यादी, धावाधाव या सगळ्याला लागणारी स्फूर्ती तो एक कप चहा छान पुरवतो. काही आहारतज्ञ दिवसाची सुरुवात चहाच्या कपाने सुरू करू नये असं कळकळीने सांगतात तेव्हा मनात आल्याशिवाय राहत नाही - ते सोडून काहीही सांगा हो!
"सकाळचा पहिला चहा" एव्हढाच विचार मनात ठेवला आणि डोळे मिटून आठवणींना डोक्यात मोकळेपणाने वावरायला जागा करून दिली की बरंच काही घडायला लागतं. आपल्या स्वतःच्या किंवा कधी कुणाकडे पाहुणे म्हणून गेलेलं असतानाचे त्यांच्या घरातले आवाज, सुगंध, वैशिष्ट्य, माणसं, घटना असं वेगळं विश्व दिसतं. जणू त्या काळातल्या किंवा त्या घरातल्या चहा बरोबर या गोष्टी आपण प्यायल्या असाव्यात. मला दर तासा दोन तासांनी चहा पिणारे माझे शिस्तप्रिय डॉक्टर आजोबा आठवतात - पहिला चहा, सकाळी ५ वाजता, ते स्वतःच करायचे. आजोळी लहान गावात चहाच्या भांड्यांच्या आवाजाबरोबर पहाटेची आजी-आजोबांची घाई गडबड, पक्षांचे आवाज, मधेच एखाद्या गायीचा किंवा म्हशीचा हंबरण्याचा आवाज, आणि खेडेगावातल्या शुद्ध हवेचा सुगंध. आमच्याकडे सकाळचा वाफाळलेला चहा, आई-बाबांची आम्हाला वेळच्या वेळी उठवून शाळेत पाठवण्याची घाई, डबे आणि त्याबरोबर मुंबई ब वर मंगल प्रभातचे सूर!
जितकी घरं वेगळी तितके चहा वेगळे आणि जितके स्वभाव तितक्या चहाच्या पद्धती! कुणाकडे तांब्याभरून असावा इतका मोठा चहाचा कप तर कुणाकडे भातुकलीत शोभावा असा. कुणाकडे दूध-साखरेवर पूर्ण निर्बंध तर कुणाकडे पाकात चहाचा फ्लेवर आणि दूध घातल्यासारखा चहा! कुणाकडे पांढरा फटक तर कुणाकडे काळाकुट्ट! काही घरी उत्साहवर्धक वेलची, गवती चहा आणि आल्याशिवाय चहा नसतो तर काही लोकांकडे गरम मसाला घातलेला तिखट्ट चहा! "डिप डिप" चा टीबॅग्स वाला चहा हा अजून एक प्रकार. टपरीवरचा कटिंग चहा हे तर वेगळंच रसायन.
चहा ही एक वनस्पती. त्या एकाच वनस्पतीची अनेक रूपं, आणि त्यातली सर्वात प्रचलित - व्हाईट टी, ग्रीन टी, उलॉंग टी, ब्लॅक टी आणि फरमेंटेड टी. चहा बनवण्याचं शास्त्र बरंच गुंतागुंतीचे आहे. चहाची ताजी पानं काही प्रमाणात सुकवून, त्यांचे लहान तुकडे करून त्यांना ऑक्सिडाईस केलं जातं आणि मग बऱ्याच जास्त तापमानाला जलद गतीने सुकवलं जातं. या सगळ्या प्रक्रिया कधी, केव्हा आणि किती प्रमाणात केल्या यावर साधारणतः चहा चे प्रकार ठरतात. आपण साधारणपणे भारतात घरोघरी वापरतो तो ब्लॅक टी.
Tepidophobia म्हणजेच दुसऱ्याच्या हातच्या चहाची भीती (आपल्याला आवडणार नाही या भावनेतून) ही, मला वाटतं, काही प्रमाणात आपल्या सर्वांना असतेच. चहा उकळण्याचे शास्त्र आहे. चांगला केलेला चहा कसा असावा, किती तापमानाला किती वेळ कढलेला असावा याबद्दल तज्ञांची बरीच ठाम मतं असतात. पण शेवटी आपल्या घरात आपण तज्ञ. आपल्या जिभेला रुचेल, आपल्या प्रकृतीला झेपेल असा चहा आपण करतो. चहाच्या खऱ्या चाहत्याला तलफ येते तेव्हा हा टेपिडोफोबिया आपला आपण पळून जातो आणि जो मिळेल तो चहा, गोड नसला तरीही गोड लागतोच!




Comments