हल्ला!
- Ketaki
- Jul 24, 2018
- 2 min read
प्रस्तावना
"सुंदर देश आहे. पुरेशी स्वच्छता, कष्टाळू नागरिक, आणि इथे जितकी संपन्नता आहे तितकीच तिथेही आहे पण गर्दी इथल्यापेक्षा खूप कमी आहे. मला तिथे स्थलांतरित व्हायचंय, तुम्ही याल माझ्याबरोबर?"
एरिकच्या पूर्वजांनी स्थलांतरित व्हायचा निर्णय घेतला होता आणि ते सगळे अत्यंत हुशारीने सीमेवरच्या सुरक्षायंत्रणेला मात देऊन देशात आले होते. पुढच्या पिढ्यांची इथेच भरभराट झाली. ____________________________________
एरिक हुशार होता. इतरांपेक्षा वेगळा. स्वतंत्र विचारशक्ती, काळानुसार आणि परिस्थितिनुसार बदलायची तयारी, असे त्याचे गुण त्याचा जमातीतल्या इतरांमध्ये नावालाही नव्हते. आणि हे त्याला ठाऊक होतं.
एरिकच्या जमातीत एक अनुवांशिक दोष होता - त्यांचे सर्केडिअन रिदम (दैनिक चक्र) उलटे होते - त्यांना दिवसा झोप लागायची आणि रात्री मात्र सगळेच नैसर्गिकरित्या जागे असायचे. ह्या दोषाचा अत्यंत चांगला फायदा करून घेऊन रात्रपाळी ही सर्वजणं करायची. रात्री शांतता असायची, एकाग्रतेत छान काम चालायचं. स्पर्धाही कमी असायची, इतर कोणी सहसा रात्रपाळी करायला तयार नसायचं.
एकदा ओव्हरटाईम करून परत येत असताना एरिकच्या कानावर काहीतरी आलं. त्याने ह्याबद्दल ऐकलं होतं - अत्यंत गुप्तपणे ह्या गोष्टी घडत होत्या सर्वत्र, पण अफवा असेल म्हणून आत्तापर्यंत त्याने दुर्लक्ष केलं होतं. रासायनिक हल्ला होणार होता!
भयानक सत्य समोर आलं. एका अत्यंत निष्ठूर सूत्रधाराच्या निर्देशाखाली देशावर हल्ला होणार होता. गुप्त हल्ला. त्याने ऐकलं होतं आधी, फार कमी जण लगेच मृत्युमुखी पडतात, मज्जासंस्थेवर परिणाम होतो, सर्केडिअन रिदम बदलते, आणि अत्यंत मंद गतीने वेदनारहित मृत्यू होतो. काही दिवसांनी परत एकदा हल्ला - चुकून कोणी वाचलं असेल तर त्याचा ही मृत्यू. अतिशय लहान हाफ-लाइफ असलेलं अत्याधुनिक रसायन काही कळायच्या आत बळी घेऊन वातावरणातून नष्ट व्हायचं जेणेकरून नेमकं काय घडलं ह्याचा थांगपत्ता लागायचा नाही कुणाला.
एरिक धावत जाऊन आपल्या भाऊबंदांना म्हणाला, "आजच रात्री आपल्या पूर्वजांच्या देशात परत जायला निघू."
"नको नको! गर्दी, घाण नको वाटते!"
"गर्दी आहे, घाणही आहे, पण आपण सुरक्षित राहू. चला माझ्याबरोबर!"
काहींनी ऐकलं आणि त्याच रात्री निघाले. पण बाकी तिथेच राहिले...
लवकरच हल्ला झाला. काही लगेचच मृत्युमुखी पडले. इतरांना अजूनही पळ काढायची संधी होती पण मज्जासंस्थेवर झालेल्या परिणामामुळे आधीच मर्यादित असलेली बुद्धी अजूनच चालेनाशी झाली आणि हळू हळू सगळे देवाघरी गेले... __________________________________
उपसंहार
फोन वाजला. "अगं, काल किती मेसेजेस पाठवले, तू ऑनलाइन नव्हतीस दिवसभर. फोन ही लागत नव्हता. आहेस कुठे?"
"अगं काय सांगू...फोन पर्स मध्ये राहिला आणि बॅटरी गेली."
"फोन विसरलीस? ठीक आहेस ना? हाहा! अगं मार्क्स अँड स्पेन्सर मध्ये फ्लॅश सेल लागला होता. 500 च्या खरेदीवर टोट बॅग फ्री देत होते! मिस केलंस तू!"
"काय हे! किती दिवस मला ती टोट बॅग हवी होती! ह्या डेड बॉडीज मुळे सगळा गोंधळ झाला बघ!"
"काय??"
"अगं दोन दिवसांपूर्वी पेस्ट कंट्रोल सर्विस झाली. ते म्हणाले, सेफ आहे औषध, त्यामुळे म्हणे झुरळं हळू हळू मरतात. अगं पण सगळी झुरळं दिवसा बाहेर येत आहेत! दोन दिवस झाले, जिकडे तिकडे झोंबीसारखी फिरत मरून पडत आहेत झुरळं. दिवसभर वॅक्युम करत्ये मी!"
Comments