चिवडा
- Ketaki
- Oct 22, 2019
- 1 min read
दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांच्या नावांचे दोन गट करता येतात - पहिला गट "पदार्थ करता येतो" आणि दुसरा, "पदार्थ फक्त खाता येतो". काही लोकं म्हणतात की पहिल्या आणि दुसऱ्या गटातली नावं सार
खीच. खरंच कौतुक वाटतं अशा लोकांचं - पण ह्यांच्यात स्वतःच्या हाताने केलेल्या वेटोळेदार भजीला प्रेमाने चकली म्हणणारे, किंवा भाजून काढलेल्या रताळ्यासारख्या चिवट चकत्यांना अनरसा म्हणणारे असतातच. परंतु बऱ्याच लोकांच्या बाबतीत दुसरा गट हा पहिल्यापेक्षा जास्त नावांनी भरलेला असतो.
पहिल्या गटात अगदी असतंच असतं ते नाव म्हणजे पोह्यांचा चिवडा. बिघडत नाही, चुकत नाही, फुटत नाही, करपत नाही. तेल-तिखट-मिठाचं साधारण प्रमाण गाठलं की झालं. थोडी गोड आणि आंबट चव आणावी; खोबरं, तीळ, शेंगदाणे, फुटाणे, काजू, बदाम जे असेल ते घालावं, आणि खाऱ्या बुंदी, बटाट्याचा कीस, चुरमूरे घालून अधिक exciting करावा.

दिवाळीच्या पारंपरिक पदार्थांना "unhealthy" म्हणणाऱ्या लोकांना या चिवड्यात सहज काही दोष सापडत नसावेत. बॅलन्सड मॅक्रो-न्युट्रीयन्ट्सच्या व्याख्येत आरामात बसतो हा पोह्यांचा चिवडा.
कसा असावा पोह्यांचा चिवडा?
व्यक्तिगणिक चांगल्या चिवड्याची व्याख्या बदलते. पण साधारणपणे कुरकुरीत आणि खुसखुशीतच्या सीमारेषेवर दिमाखाने चालणारा, फोडणीतल्या ताज्या हिरव्या मिरचीचा बोचरा तिखटपणा जिभेवर सोडून जाणारा, कढीलिंबाचा सुगंध प्रत्येक कणात मिरवणारा, आणि मनापासून वाटीभर खाऊन झाल्यावर समाधानाने वाटी बाजूला ठेवायची इच्छा करून देणारा असा असावा मस्त चिवडा.
कसा खावा पोह्यांचा चिवडा?
मधल्या वेळी, डोळे बंद करून, एकेक कणाचा आस्वाद घेत, mindfully!
Comments