चिनी नववर्ष
- Ketaki
- Feb 8, 2022
- 2 min read
चिनी नववर्ष हा हाँग काँग मधला फार मोठा सण. आपल्याकडे दिवाळीत जी गंमत असते ती स्थानिक लोकांसाठी नववर्षाला असते. भेटी गाठी, भेटवस्तू, नवीन कपडे आणि सुट्ट्या! लाईसी नावाची लाल आणि सोनेरी पैश्याची पाकिटे देण्याची एक विशिष्ट पद्धत असते ज्याला काटेकोर नियम असतात - कोणी कुणाला द्यायचं, किती द्यायचं, केव्हा द्यायचं. मुलांना या काळात भरपूर लाईसी मिळतात. "गॉंग शी गॉंग शी गॉंग शी नी" असं एक नववर्षाच्या शुभेच्छा देणारं गमतीशीर गाणं या दिवसात शाळेत शिकवतात आणि गातात. हे गाणं पुतुंह्वा म्हणजेच मँडरिन या भाषेतलं. इंटरनॅशनल शाळेत तीच भाषा शिकवतात. हॉंगकॉंग ची भाषा कॅन्टनीज. या भाषेत शुभेच्छा देताना म्हणतात "कुं हेइ फात चॉइ!" - "तुम्हाला समृद्धी लाभो!"
एखाद्या वातावरणात राहिलं कि विशिष्ट वेळी एखाद्या प्रसंगाची आठवण येतेच. आम्हा भारतीयांचा स्थानिक लोकांबरोबर सहसा संबंध येत नाही तरीही त्यांच्या उत्साहाची, आनंदाची लागण आम्हालाही होतेच. मोजके हाँग काँग चिनी मित्र मैत्रिणी आठवणीने मुलांना लाईसी देतात, नववर्षानिमित्त भेटवस्तू आम्हाला हि मिळतात आणि पद्धतीप्रमाणे आम्हीही लाईसी आणि भेटवस्तू देतो. तीळ, शेंगदाणे आणि साखरेचं सारण भरलेल्या करंज्या या काळात इथे मिळतात. खूप मोठ्या प्रमाणावर डॅनिश बटर कूकीजचे टिन्स दुकानात विकायला येतात - डॅनिश कुकीज का, त्याचा अजून काही मला पत्ता लागलेला नाही, हरकत नाही कुकीज असतात छानच! बिस्किट्स, चॉकलेट्स यांची रेलचेल असते, आणि नववर्ष ज्या प्राण्याचं असेल त्या प्राण्याचे जिकडे तिकडे सॉफ्ट टॉय दिसतात - पण प्राणी कुठलाही असो, सॉफ्ट टॉय नेहमी लाल रंगाचे!
लाल, सोनेरी, केशरी हे इथे शुभ रंग मानले जातात. नववर्ष हे वसंताचं आगमन म्हणून साजरं केलं जातं. नववर्षाच्या १-२ दिवस पुढे मागे कोकिळा पहाटे येतेच येते. थंडी कमी व्हायला लागते, हिरवळ दिसायला लागते आणि असंख्य रंगांची फुलं, ऑर्किड्सची झाडं भेटवस्तू म्हणून बाजारात येतात. त्याचबरोबर येतात फळांनी लगडलेली लहान संत्र्यांची झाडं. दारोदारी केशरी फळांच्या कुंड्या दिसतात. ती फळं शोभेची जास्त असतात, खाता येत नाहीत पण बाजारात मात्र या फळांच्या राशी दिसायला लागतात आणि त्यांच्या दर्शनाने जणू चैतन्य येतं!
हॉंगकॉंग मधलं सगळ्यात जास्त काय आवडतं हे मला कोणी कधी विचारलं तर मी म्हणेन लिम्लेटच्या आंबटगोड गोळ्यांची ही सुगंधी गाठोडी. वजनावर मिळतात त्यामुळे बऱ्याच वेळा पानांसकट असतात त्याची गंमत वाटते. निसर्गाने ८-१० फोडी सुबकपणे धाग्यात गुंडाळून ठेवलेल्या असतात. देठ ओढून काढलं की गाठोडं सुटायला लागतं आणि काही कळायच्या आत फस्त होतं. आज ही संत्री सोलताना जरा गंमत करावीशी वाटली, फोटो काढले त्यांचे कौतुकाने, त्यांच्या आत डोकावले, पण फार संयम राखून, न खाता, हे काम करावं लागलं!
Comments