घाणेरी
- Ketaki
- Sep 9, 2019
- 1 min read

हाँग काँग मध्ये उन्हाळ्याच्या दिवसात बऱ्याच ठिकाणी घाणेरी फुललेली दिसते. काही ठिकाणी ही झाडं आपली आपण उगवलेली असतात पण बऱ्याच ठिकाणी लँडस्केपिंग साठी लावतात. खूपच गमतीशीर फुलं असतात घाणेरीची. लहान लहान फुलांचा समूह, प्रत्येक लहान फुलाला ४ पाकळ्या. छान गोल आकारात सुबक मांडणी. घाणेरीचे बरेच रंग असतात असं ऐकलंय पण इथे पिवळी-गुलाबी फुलंच जास्त दिसतात. नवीन उमललेली फुलं पिवळी असतात आणि जून होतात तशी गुलाबी होत जातात. कळ्यांचा गुच्छ एखाद्या क्रोशाच्या गोल आखीव रुमालासारखा दिसतो आणि फुलत आलेल्या कळ्या एखाद्या फुलपाखरासारख्या. पानं अतिशय सुरेख, नाजूक आणि रेखीव - चित्र काढल्यासारखी. लांबच्या लांब परिसरात पसरलेली सुंदर घाणेरी; हिरवळीत अनेक रंग शिंपडून बहरणारी घाणेरी बघितली की एकच प्रश्न पडतो - हिचं नाव असं विचित्र का?
Comments