त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का?
- Ketaki
- Oct 25, 2021
- 2 min read

(फोटो इंटरनेट वरून घेतलेला आहे)
गायक आपण सगळेच असतो. काही सुरेल, काही बेसूर. आणि काही सूर आणि बेसूरच्या मधेच अधांतरी अडकलेले. काही सुरात गातात, सुरेल गातात, त्यांच्या गळ्यात ट्रॅपीझ आर्टिस्ट दडलेले असतात... सुरांच्या माध्यमातून सुरेख सर्कस करतात. त्यातले काही अशा काही करामती करतात कि ऐकणारे गुंग होतात, नाचायला लागतात. पण काही फार वेगळे असतात. सुरांची सर्कस करता येणे सहज शक्य असते, सुरांचा दुसऱ्याला गुंग करायचे साधन म्हणून वापर यांना लीलया करता येऊ शकतो. पण गम्मत अशी कि त्यांना ते करायचेच नसते. त्यांना सूर इतका समजलेला असतो की ते सुरांची भाषा करतात. त्यांतून हट्ट, राग, आनंद, व्यथा व्यक्त करतात. * एका लहान मुलाला त्याची आई सांगते, "देव सगळीकडेच आहे!" त्याला नाही कळत त्याचा अर्थ आणि तो निघतो "त्या"ला शोधायला... शोध शोध शोधतो पण "तो" काही सापडत नाही. तो रागावतो, हट्टाने म्हणतो, आत्ताच्या आत्ता सांग, कुठे आहेस? * आणि गाण्याला सुरुवात होते...
"त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का?"
"सांग" हा शब्द असा काही फेकला जातो की त्यात असलेला अधीरपणा, उतावीळपणा सणसणीत व्यक्त होतो.
"त्या प्रकाशी तारकांच्या ओतिसी तू तेज का?"
वरवरचा हट्टीपणा जिज्ञासेला वाट करून देतो आणि मंद्र सप्तकातले सूर ते सहज व्यक्त करतात.
"त्या नभांच्या नीलरंगी होऊनिया गीत का?"
जिज्ञासा हळू हळू प्रशंसेत बदलते, सूर दिशा बदलतात आणि आनंद दाखवायला लागतात. "गीत" हा शब्द म्हणतानाच फक्त गाण्यात पहिल्यांदाच गळ्याची करामत दिसते.
"गात वायूच्या स्वरांनी सांग तू आहेस का?"
वाऱ्याबरोबर अलगद उडणारा "वायू" हा शब्द येतो आणि मग दिसते कळकळ... "सांगत का नाहीयेस मला?" * वय वाढतं, थोडी प्रगल्भता येते... आणि अव्यक्त गोष्टींमध्ये ही शोध सुरु होतो... * "मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का?"
कधीतरी माझ्यात जाणवतोस तो "तूच" आहेस का? या भावनेतून येणारी आशा, आनंदाचा पुसटसा किरण सुरांतून, शब्दफेकीतून व्यक्त होतो
"आ S S S"
आनंदाचे रूपांतर अचानक एका चिंतेत होते.
"वादळाच्या सागराचे घोर ते तू रूप का?"
निसर्ग संकटांमध्ये ही "तो" दिसतो आणि मन व्यथित होतं, मंद्रातल्या धैवतापासून तारसप्तकातल्या षड्जापर्यंत सूर हेलकावण्या खात प्रवास करतात
"जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का?"
मग आवाजातून सहज येते कृतज्ञता
"आसमंती नाचणारी तू विजेची रेघ का?"
आणि मग परत एकदा "त्या"च्या असण्याचा आनंद व्यक्त होतो... विजेप्रमाणेच "नाचणारी" हा शब्द गळ्यातून नाचतो!
*
गाणं चालू राहतं. सूर्यकांत खांडेकरांची कविता थक्क करते. सूर सुन्न करतात.
पण सर्वात जास्त प्रभाव पडतो तो गाण्यातल्या संयमाचा.
गाणं हे फक्त भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे असा पंडित हृदयनाथ मंगेशकरांचा ठाम विश्वास असावा असं वाटतं.
खरं काय असतं या महारथींच्या मनात ते त्यांनाच ठाऊक. पण त्यांचं प्रत्येक गाणं एका युनिव्हर्सिटी मध्ये शिकायला मिळू शकेल इतकं शिकवून जातं. असं वाटतं की जर आपल्याला कधी गाता आलं तर फक्त यांच्यासारखं गावं.
आज पंडित हृदयनाथ मंगेशकर ८५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना...




Comments