top of page

पोपो

  • Ketaki
  • Nov 26, 2018
  • 2 min read


ree
AI artwork created using https://www.aiartgenerator.cc/

हाँग काँगच्या संस्कृती बद्दल बरंच लिहिता येईल. इकडची खाद्य संस्कृती, पेहराव, धर्म, नास्तिकता, उपभोक्तावाद, सिनेसंस्कृती, पर्यटन, सगळंच एकीकडे आपल्याहून फार वेगळं पण तरीही कुठेतरी आपल्या संस्कृतीला खूप जवळचं असलेलं असं. इथे आल्यापासून एक गोष्ट मला खास आवडते आणि त्या गोष्टीबद्दल भयंकर कुतूहल वाटतं. ती म्हणजे हाँग काँगच्या टापटीप राहणाऱ्या, शिस्तप्रिय आणि अतिशय गप्पिष्ट आज्या!


पोपो किंवा पॉपॉ (किंवा त्या मधला काहीतरी उच्चार) - कॅन्टोनीज मध्ये आजीला असं संबोधतात. इथे आल्यापासून कितीतरी पोपोंबरोबर माझी तोंडओळख झाली आहे. आपल्याकडे असते तशीच कुटुंबव्यवस्था असावी इथे - आई बाबा कामावर गेलेले आणि मुलं पोपो जवळ. पोपोंबरोबर कधीतरी सोबतीला आजोबा - येये आणि यॅयॅ या मधला काहीतरी उच्चार - आणि मदतीला कधीतरी एक फिलिपिनो किंवा इंडोनेशियन हेल्पर. अगदी लहान कापलेले केस, कॉलर वाला रंगेबिरंगी स्मार्ट टीशीर्ट, काळेभोर रंगवलेले केस आणि गम्मत म्हणजे अतिशय बारीक आणि तीक्ष्ण निळ्या रंगवलेल्या भुवया - असा ह्या पोपोंचा अवतार. बहुतेक वेळा बघताक्षणी आदर वाटावा असं व्यक्तिमत्व (अर्थात प्रत्येक गोष्टीत टोकाचे अपवाद असतात तसे इथेही आहेत, पण अपवादांना संस्कृतीचा भाग म्हणणं चूक). काही आवर्जून इंग्लिश मध्ये गुड मॉर्निंग म्हणणाऱ्या, तर काही "जो सान!" असं कॅन्टोनीज मध्ये. काही अगदी मोजून मापून संवाद साधतात तर काहींना बोलायची इतकी आवड कि मला कॅन्टोनीज मधला एकही शब्द कळत नाही हे समजूनही लिफ्ट मध्ये प्रेमाने मोठाच्या मोठा सल्ला देऊन जातात.


"इतकी मोठी स्कूलबॅग देऊ नकोस मुलीला, पाठ दुखेल तिची!", "अगं हे फूल (बिट्टीचं) विषारी असतं, मुलीच्या हातून लगेच काढून घे!" पासून "कमीत कमी ८-९ मुलं हवी" पर्यंत सगळे सल्ले मिळतात. कमाल म्हणजे मला एकदा एक सिंगापुरी चिनी आजी भेटल्या आणि त्यांना माझा जन्म पुण्यातला हे ऐकून जो आनंद झाला सांगू! त्यांचा मुलगा म्हणे पुण्यात नोकरी करतो. अगदी मुंबईग्रस्त पुणेरी आजींचा अविर्भाव होता त्यांचा!


पहाटे ५ वाजल्यापासून ह्या पोपो कधी एकट्या तर कधी हेल्परसह व्यायामासाठी बाहेर पडलेल्या दिसतात. आळस हा त्यांच्या रक्तातच नसावा त्यामुळे तो कुठे चरबी रूपात अवतरत नाही ;-) "ताईची", मारशियल आर्टचा एखादा प्रकार, पंखा घेऊन चिनी नाच, नाहीतर झप झप चालणे, हातापायाच्या वयोमानानुसार जलद हालचाली असे ह्यांचे आवडते व्यायाम. एक पोपो आमच्या घराखाली रोज सकाळी दिसायच्या. कमाल वाटावी अशी टाप टीप, टीशर्ट, पर्स, शूज, नेलपेंट ची परफेक्ट रंगसंगती, ताठ कणा, आणि त्यांचा अर्ध्यातासाचा ठरलेला व्यायाम. सगळं घड्याळाच्या काट्यावर. ८:३० - ९ च्या सुमाराला बऱ्याच पोपो भाजी आणायला मंडईत जातात. त्यांच्या पिशव्यांमधल्या पालेभाज्यांकडे बघितलं की लगेच त्यांच्या तकाकीचं रहस्य कळतं. काही नातवंडांबरोबर पार्क मध्ये किंवा शाळेत दिसतात. नातवंडांची एनर्जी आणि लवचिकता ह्यांच्यात पण तितकीच दिसते - "दमले रे राजा, कंबर दुखली, किती पळवशील" हे असं काही घडतंच नसावं ह्या संस्कृतीत अशी शंका येते!


काही ब्रेकफास्ट साठी नियमाने रोज ठरलेल्या कॉफी शॉप मध्ये बसलेल्या दिसतात. कधी एकट्या, कधी येयेंबरोबर. हेल्परची मदत घेऊन व्हीलचेअर वरून मॉल मध्ये फिरतात, गॅम्बलिंग करतात, शॉपिंग करतात - चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स, समाधान, आनंद चकित करतो. व्हीलचेअरवर असतानाही टापटीप तशीच. आत्मसम्मान म्हणजे काय ह्याचं प्रात्यक्षिक देतात ह्या पोपो. Life Goals!


बाहेर पडले कि २-३ पोपो तरी भेटतात. माझा नवरा नेहमी विचारतो, आता ह्या कोण? की मी सांगते, "त्या १५व्या मजल्यावरच्या जोशी आजी!", "ह्या शाळेत येतात त्या मोरे आजी, ह्यांचा नातू शाळेत आहे!", "ह्या प्रधान आजी - रोज ह्या वेळेला पार्क मध्ये दिसतात" - नावं काहीही असोत, कधी कळणार नाहीत, तरी आजी ती आजी!


जगातली सर्वात जास्त life expectancy असलेलं शहर आहे हाँग काँग. त्यात ह्या पोपोंची life expectancy ८७.३ वर्ष! शारीरिक, मानसिक आरोग्य, शिस्तबद्ध पण परिपूर्ण जगण्याची इच्छा हेच ह्याचं रहस्य!

Comments


Send us a message
and we’ll get back to you shortly.

Thanks for submitting!

© 2022 by Grains, Pebbles, Flowers. Proudly created with Wix.com

bottom of page