वर्क फ्रॉम होम
- Ketaki
- Apr 27, 2020
- 2 min read

बऱ्याच वर्षांपूर्वी मी २ वर्षं घरून काम करत होते. सकाळी ९ वाजता लॉग-इन करायला लागायचं आणि मुंबईतल्या शिरस्त्याप्रमाणे काम थांबवण्याची ठराविक वेळ नसायची. उत्तम दिवस म्हणजे ९ ते ६ आणि एक अखंड अर्ध्या तासाचा लंच ब्रेक. पण असं सहसा व्हायचं नाही. चालूच असायचं दिवस भर. सुरुवातीचे काही दिवस छान गेले. मुख्य काय तर लोकलचा २ तासाचा प्रवास नव्हता. घरातले विषय हाताळता हाताळता छान काम होत होतं आणि स्वतःच्या multitasking चा अभिमानही वाटत होता. हळू हळू मात्र या गोष्टींचा त्रास व्हायला लागला. फोकस मिळेनासा झाला. वेळी अवेळी वाजणारा फोन, कुकरच्या शिट्ट्या, बाहेर खेळणाऱ्या मुलांचे आवाज, सारखी वाजणारी बेल, आणि बेशिस्तपणे बसल्यामुळे दुखणारी पाठ सगळंच बोचायला लागलं. त्यात एकटेपणा! सहकर्मचाऱ्यांबरोबर टीमवर्कचं समाधान, चहा, वडापाव, गप्पा, थट्टा मस्करी सगळंच थांबलं! वर्क फ्रॉम होमचा वैताग यायला लागला.
कालांतराने जाणीव व्हायला लागली कि ऑफिसचं काम घरून करण्याचा त्रास होत नाहीये तर एकटेपणाचा आणि lack of focus चा त्रास होतोय. आणि मग आई, आजी, मावशी, काकू आणि माझ्या काही गृहिणी मैत्रिणी आठवल्या ज्या अत्यंत उत्तमरीत्या isolation आणि lack of focus मध्ये multitask करत होत्या, वर्षानुवर्षं, विनातक्रार!
आज भारतात बरेच जण WFH करत आहेत. आणि त्यातले बरेच अशाच मनस्थितीत आहेत. मनात आलं, गृहिणी असलेल्या बायकांनी बोलायचं ठरवलं तर त्या काय बोलतील?
"वर्क फ्रॉम होम"- हे असं, ते तसं, किती ते अवघड! चार दिवस काय घरात राहिलात, केव्हढी ती रडारड!
नेटवर्कचा स्पीड कमी, टेबलची उंची कमी, आवाज किती जास्त! आमच्या ऑफिसात कसं सगळं परफेक्टली बॅलन्स्ड असतं!
प्रोडक्टिव्हिटी आमची होते लो, एफिशनसी नाही, सगळंच स्लो! लॉकडाउनने केली किती ही अडचण ... तेवढं ऑफिसात जाऊद्या हो!
"वर्क फ्रॉम होम"- हो असंच! हो असंच!! असतंच मुळी ते अवघड. अंत नाही आमच्या घरात राहण्याला तरी कधी नाही केली रडारड!
स्वयंपाक केला, स्वच्छता केली, मुलंही वाढवली मस्त! पाहुणे, सणवार, तुमची बडदास्त आमचं पण बॉ बॅलन्स्डच असतं!
प्रोडक्टिव्हिटी, एफिशनसी एक्सक्युजेस भारी सुचवलेत हो! "वर्क एट होम-वर्क फॉर होम" हे पण "वर्क"च - जाणीवच झाली थोडी स्लो!
"वर्क फ्रॉम होम" - हे असं, ते तसं, हो खरंच ते अवघडच असतं! तुम्हाला वाटतं तसंच ते गृहिणीलाही वाटतं.




Comments