तिळगुळ घ्या आणि गोड बोला
- Ketaki
- Jan 14, 2020
- 1 min read
संक्रांत जवळ आली की तिळगुळ, हळदीकुंकू, त्यातले वाण, टिकल्यांची पाकिटे, काळे कपडे, हलवा आणि पतंग हे विषय अगदी सहज मनात येतात आणि आनंद देतात. हाँगकाँगला आल्यापासून मात्र एक भलताच प्रश्न मनात भीती निर्माण करून जातो. चांगला गूळ मिळेल का?
भारतात असताना गूळ हा विषय वाण्याला फोनवर साधा गूळ का चिकीचा गूळ एवढं सांगितलं की संपायचा. गोंधळ म्हणजे नेमकं काय तर साध्याऐवजी चिकीचा पाठवला किंवा उलट. अजून थोडा गोंधळ म्हणजे काय तर गूळ नेहमीपेक्षा काळा किंवा पांढरा दिसतोय. फार मोठे विषय नाहीतच हे. आता ऑरगॅनिक आणि काय ते सगळं मिळायला लागलाय असं ऐकलं, त्याने गोंधळ वाढले असतील तर माहिती नाही.
जेव्हा हॉंगकॉंगला आले तेव्हा एक मराठी मैत्रीण म्हणाली, "अगं, चिकीचा गूळ मिळतच नाही इथे, त्यामुळे तिळाचे लाडू करता येत नाहीत!". मी "अरेरे" असं म्हटलं खरं पण मनातल्यामनात आनंद झाला कारण आमच्याकडे तिळाची वडी करतात आणि ती ही साध्या गुळाची. गोंधळाची शक्यताच संपली म्हणून बरं वाटलं.
इथली पहिली संक्रांत आली, आणि पहिल्यांदाच गूळ मागवला. आणि एका गमतीशीर गूळ अनुभव मालिकेला सुरुवात झाली.
धडा पहिला - चिकीचा आणि साधा या व्यतिरिक्त गुळाचे माणसांइतकेच वेगवेगळे प्रकार आणि स्वभाव असतात.

राखाडी, काळा,
तपकिरी, पिवळा,
प्रत्येक वेळी,
रंग त्याचा वेगळा!
कधी अर्धवर्तुळाकार,
कधी पूर्ण रेती,
कधी ठोकळा,
आकार त्याचा वेगळा!
गूळ कशासाठी वापरावा
गोड करण्या पदार्थाला
इथे खारट ही मिळतो
स्वाद त्याचा वेगळा!
चिरून, किसून कसाही वितळवावा,
बत्त्याने फोडून, फेकून मारावा
लहरी दगड हा आगळा,
ढंग त्याचा वेगळा!
माप तिळा-गुळाचे
बदलावे दरवर्षी तिळगुळाला
आव्हान असे सर्वांपुढे
माज त्याचा वेगळा!
नेहमीच्या अडीचपट मापाने वापरलेल्या लाल गुळाचा लाल तिळगुळ घ्या आणि गोड बोला!
Comments